आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Taking A Bribe, Anti Corruption Department Team Caught

दोन हजारांची लाच घेताना पोलिसाला पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील शहर कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. १९) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास झाली आहे. या प्रकाराने शहरातील पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रलय वाघमारे असे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या पोलिसाचे नाव आहे. प्रलय वाघमारे हा शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या डी. बी. पथकामध्ये कार्यरत आहे. गुन्हा दाखल असलेल्या एका व्यक्तीकडूनच त्याने लाचेची रक्कम स्विकारल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजकमल चौकात शुक्रवारी (दि. १८) सांयकाळी एका व्यक्तीला वाहतूक पोलिसांनी थांबवले असता त्याने वाहतूक पोलिसांसोबत वाद घातला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचेकडे पोलिसांना चाकू मिळून आला. त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरुध्द शासकिय कामात सहकार्यन करणे तसेच जवळ शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्या आरोपीला शनिवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयातून जामिन मिळाला. या प्रकरणाचा तपास कोतवालीचे उपनिरीक्षक विजय चव्हान यांच्याकडे आहे. त्याला जामिन मिळाली असताना तसेच डि. बी. पथकातील पोलिस प्रलय वाघमारे याचा त्या प्रकरणाशी कोणताही संबध नसताना त्याला प्रलयने दोन हजार रुपये मागितले होते.
हीच रक्कम देण्यापुर्वी संबधित व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री कोतवाली ठाण्याच्या परिसरात सापळा रचला लाच घेत असताना प्रलय वाघमारेला दोन हजारांची लाच घेताना पकडले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती पथकाने केली आहे. अशी माहीती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भातकुले यांनी दिली आहे.