आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या ‘पुराण्या’ बिथरल्या!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पिकांचे नुकसान, दुष्काळी परिस्थिती आणि प्रशासनाच्या अडवणुकीचा तीव्र संताप प्रहारच्या मोर्चात भाला-पुराणी घेऊन शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तालयात व्यक्त केला. जीवन असह्य झाले असताना दुष्काळाची घोषणा नाही, दिलासा देणारी उपाययोजना नसल्याने शेतकरी आज (१९ नोव्हेंबर) चांगलेच बिथरले. शेतकऱ्यांच्या स्थितीला जबाबदार सरकार प्रशासनाचे आमदार बच्चू कडू यांनी चांगलेच वाभाडे काढले. शेतकऱ्यांच्या आठ ते दहा तास चाललेल्या आंदोलनामुळे प्रशासनाला देखील चांगलीच कसरत करावी लागली.

पंचवटी चौकातील संत गाडगेबाबा समाधी मंदिरातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. दुपारी वाजता ४०० ते ५०० दुचाकीस्वार शेतकरी विभागीय आयुक्तालयाकडे निघाले. इर्विन, गर्ल्स हायस्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय बियाणी चौकातून मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. आमदार बच्चू कडू देखील शेतकरी कार्यकर्त्यांसाेबत दुचाकीवर मोर्चात सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. असे असतानादेखील विभागीय अायुक्त कार्यालयासमोरील सुरक्षा कठड्यांवर प्रहार कार्यकर्त्याने दुचाकी आदळली. थेट दुचाकीने सुरक्षा कठडे छेदत शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तालयावर कूच केले. मात्र, आमदार कडू यांनी रस्त्यावर शेतकऱ्यांना शांत केले. या वेळी आमदार कडू यांनी भाषणातून सरकारला चांगलेच ठणकावले. शेतकऱ्यांच्या ‘अच्छे दिन’चा सरकारला विसर पडला असून, वीज कंपनीच्या ढिसाळ प्रशासनावर ताशेरे ओढले. वऱ्हाडी भाषेत शिव्यांची लाखोळी वाहत आमदार कडू यांनी सरकार प्रशासनावर चांगलेच तोंडसुख घेतले. मागील चार ते पाच वर्षांपासून कधी दुष्काळाने नापिकी, कमी भाव, कर्ज पुनर्गठनाबाबत प्रशासनाची अडवणूक अशा अनेक संकटात शेतकरी जीवन जगत आहे.

शिवाय विवाह, दु:खद घटना, शेतीचा खर्च, आजारपणाचा खर्च भागवता येईल ऐवढा पैसा हाती येत नाही. पेरणी-लागवडीला लावलेला खर्चदेखील दुष्काळामुळे मिळणे नाही. बँकेतून कर्ज मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना जमीनदेखील योग्य प्रकारे पिकवता आली नाही. दुष्काळातून वाचलेल्या पिकाला देखील हमीभाव मिळेल, अशी स्थिती नाही. खरिपाचे गेले किमान रब्बी हंगामातील तरी पिके घेता येईल, या आशेवर शेतकरी होता. मात्र, वीज नसल्याने पाण्याअभावी हे पीकदेखील हातातून जाण्याची वेळ आली आहे.

शंभर डीपी मिळणार
चर्चेमध्ये २०० नादुरुस्त असलेल्या डीपींची मागणी लावून धरण्यात आली होती. बराच वेळ चाललेल्या चर्चेनंतर १०० डीपी लावण्याचे प्रशासनाकडून मान्य करण्यात आले अाहे. याबाबत महावितरण कंपनीकडून १०० डीपी लावण्याचे कार्य तत्काळ आरंभ केले जाणार आहे.
२०० डीपी कधी? : मागीलहिवाळी अधिवेशनापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी २०० डीपी पाहिजे असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या वेळेस देखील आमदार कडू यांनी २०० डीपींचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवला. मागील एक वर्षात महावितरण कंपनीकडून लोकप्रतिनिधीकडून करण्यात आलेल्या मागणीची पूर्तता करू नये, यापेक्षा आणखी दुसरी कोणती दुर्दैवी बाब असू शकत नाही.

आयुक्तांना भाला भेट
आलारे आला शेतकरी आला. भाला, पुराणी, संत्री, कापूस घेऊन शेतकरी आला असल्याची माहिती आमदार कडू यांनी विभागीय आयुक्तांना भाषणातून दिली. मागण्यांचे निवेदन देण्यापूर्वी आमदार कडू यांनी विभागीय आयुक्तांना शेतकऱ्यांनी आणलेला लाकडी भाला भेट दिला. आयुक्तांसोबत चर्चा करतेवेळी धीरज जयस्वाल, प्रवीण देशमुख, रावसाहेब लंगोटे उपस्थित होते.

पोलिसांचा अटकाव
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
१)पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे मनरेगातून करा
२) संत्रा, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार मदत द्या
३) कापसाला हजार रुपये हमीभाव
४) विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेत बीपीएलची अट रद्द करा
५) शेतमजूर, विधवा, अपंग अनाथांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्या
६) कर्ज माफ करा किंवा व्याज माफ करा, नवीन कर्ज द्या
७) डीपी बंद असल्यास वीज बिल वसूल करू नये
८) दोन दिवसात नवीन डीपी बसवण्यात यावी
९) ५० टक्के नादुरुस्त असलेल्या डीपींची दुरुस्ती करा
१०) पैसे घेऊन क्षमतेपेक्षा विद्युत पुरवठा करणाऱ्या अभियंत्याला निलंबित करा
११) जिल्हा बँकेतील २१ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे तत्काळ पुनर्गठन करावे.
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना आमदार बच्चु कडू यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी लाकडी भाला, पुराणी घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.