आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन व्यापक करण्यासाठी आज बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भराज्य निर्मितीचे आंदोलन अधिक व्यापक बळकट करण्याच्यादृष्टीने उद्या, मंगळवार, १७ नोव्हेंबरला अमरावतीत सर्व विदर्भवाद्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. ‘फेडरेशन फॉर न्यू स्टेट’च्या मध्यस्थीने ही बाब जुळून आली असून गणेश कॉलनी स्थित गणेश मंदिरात दुपारी वाजता ही बैठक सुरू होईल. यावेळी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांची उपस्थिती राहणार आहे.

या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशनचे अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. गणेश खारकर त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी येथील श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ही माहिती देण्यात आली.

विदर्भाचे राज्य स्थापन व्हावे, यासाठी वेगवेगळे पक्ष संघटना आंदोलने करीत आहेत. या आंदोलनांना संयुक्त स्वरुप प्राप्त व्हावे म्हणून ही तयारी केली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.पत्रकार परिषदेला डॉ. खारकर यांच्यासह फेडरेशनचे प्रवक्ते राजेंद्रसिंह राजपूत, ‘आप’च्या रंजना मामर्डे, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, अंबाडेकर, दातेराव, राजेंद्र चिंचमलातपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

आंदोलनाचे स्वरूप ठरवण्यात येणार
विदर्भराज्याच्या स्थापनेसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची रुपरेषा या बैठकीत निश्चित केली जाईल. देशात अलिकडच्या काळात स्थापन झालेल्या छोट्या राज्यांसाठी फेडरेशनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचाही गोषवारा या बैठकीत मांडला जाऊन आंदोलनाचे नेमके स्वरूप काय असावे, हे स्पष्ट होणार आहे.

भाजपला त्यांचा शब्द आठवण करून देऊ
^विदर्भराज्य देऊ, हे भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच घोषित केले होते. निवडणुकीच्या वेळी त्यांनी या मुद्द्याची प्रामुख्याने आठवण करुन दिली. यावेळी राज्य केंद्रात त्यांची सत्ता आहे. शिवसेना हा त्यांचा मित्र पक्ष आहे. तो विरोध करीत असला तरी भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांना आम्ही त्यांचे शब्द लक्षात आणून देऊ. डॉ.गणेश खारकर, विभागीय अध्यक्ष, अमरावती.