आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारींची तपासणी तहसीलदारांमार्फत, सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सावकारीपाशा मुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बाब जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी घोषित केली असून, सावकारांविरुद्धच्या तक्रारींची तपासणी तहसीलदारांमार्फत करण्याचे ठरवले आहे. सोमवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेत त्यांनी स्वत:च ही बाब माध्यमांसमोर स्पष्ट केली.

ते म्हणाले की, जिल्ह्यात सावकारांना भरपाई देण्याची सुमारे ५६ हजार प्रकरणे आहेत. मात्र, त्या तुलनेत सावकारांनी अवैधपणे जमीन वा तारण वस्तू हडपल्या, अशा तक्रारी केवळ सहा आहेत. याचाच अर्थ शेतकरी कोणाला तरी घाबरतात, हे स्पष्ट असून, त्यांनी बिनदिक्कत पुढे यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे सहकार खात्याच्या भुवया उंचावल्या असून, या प्रकरणांची चौकशी त्यांच्यामार्फत करता थेट महसूल खात्यामार्फत (तहसीलदार) करणे म्हणजेच त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करणे होय, असा त्याचा अर्थ काढला जात आहे. मुळात अवैध सावकारीबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींना पडताळून पाहण्याचे कार्य सहकार विभागामार्फत म्हणजेच जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयातून केले जाते. परंतु, गेल्या अनेक दिवसांत शेतकऱ्यांमार्फत झालेल्या तक्रारींबाबत या खात्याने योग्य ती पावले उचलली नाहीत, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. कदाचित त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा तर्क लावला जात आहे.

जिल्ह्यात३२ प्रकल्प रखडले : रखडलेल्या३२ सिंचन प्रकल्पांसाठी २०१८ ची डेडलाइन जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठा आहे. तब्बल ३२ प्रकल्प रखडले आहेत. त्यांपैकी दोन पूर्णत्वास गेले असून, मार्च २०१६ अखेर आणखी तीन प्रकल्प पूर्ण होतील, असे नियोजन आहे. याशिवाय उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २०१८ पर्यंतची डेडलाइन आखण्यात आली असून, त्या कालावधीत हे प्रकल्प पूर्णत्वास जातील, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नावे गुप्त ठेवू
^शेतकऱ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या तक्रारी स्वत:हून माझ्याकडे कराव्यात. नावे उघड होण्यामुळे गोंधळ उडणार असेल, तर शेतकऱ्यांनी निनावी तक्रारी कराव्यात. त्यांची गुप्तता राखली जाईल. ई-मेल, मेसेजच्या माध्यमातूनही तक्रारी स्वीकारल्या जातील. किरण गित्ते, जिल्हाधिकारी,अमरावती.

बातम्या आणखी आहेत...