आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"सीआर'अभावी रखडली आरोग्य कर्मचारी पदोन्नती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- जिल्हाआरोग्य विभागातील तब्बल शंभरावर आरोग्य कर्मचारी कालबद्धपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात आरोग्य विभागही बोलण्यास तयार नाही. सध्या शंभरावर कर्मचाऱ्यांचे सीआर गहाळ झाले आहे. परिणामी, ही कालबद्ध पदोन्नती दिल्या जात नसल्याचा आरोप नर्सेस आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाचा कारभार पार ढेपाळून गेला आहे. वारंवार नर्सेस आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणा कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यास तयार नाही. तीन ते चार महिन्यांपूर्वी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी १५ दिवसांत संपूर्ण प्रकरणाचा निपटारा करू, असे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले होते. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाला संपूर्ण कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल तयार करावा, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले होते. दीडशेंवर कर्मचारी या पदोन्नतीपासून वंचित होते.

प्रत्यक्षात मात्र, ५० कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल प्राप्त झाले. उर्वरित शंभर कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्यापही आरोग्य विभागाला गवसलेच नाही. परिणामी, आजही हे कर्मचारी कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित आहेत. यासंदर्भात संघटनेने आयुक्तांना पत्र पाठवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आयुक्तांनी सीईओ, अतिरिक्त सीईओं यांच्या उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, असे सुचवले होते. त्यावरून बैठकही पार पडली. परंतु, बैठकीतील कुठल्याच मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आला नाही. यासाठी आरोग्य विभागाचाच पुढाकार नसल्यामुळे हे प्रकरण थंडबस्त्यात पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी कडक पावले उचलून तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तोडगा निघाल्यास आंदोलन होणार आहे.

वेतन आयोगाचे हप्ते थकले
पंचायतसमितीस्तरावर सहाव्या वेतन आयोगाचे संपूर्ण हप्ते जमा होणे गरजेचे होते. मात्र, अद्यापही कुठल्याच प्रकारचा निधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांना व्याजाच्या रकमेपासून वंचित राहावे लागत आहे.

बैठकीचे इतिवृत्त प्रलंबितच
आयुक्तांनापाठवण्यात आलेल्या पत्रावरून अधिकारी आणि संघटनेची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक जिल्हा परिषदेत पारसुद्धा पडली. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेअंती संपूर्ण प्रश्नाचे निराकरण करू, असे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे दीड महिना उलटल्यानंतरही बैठकीचे इतिवृत्त देण्यात आले नसल्याचे माहिती आहे.

चार कर्मचारी प्रतिनियुक्तीवर
जिल्हाआरोग्य विभागात आजही चार कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. विशेष म्हणजे हे चारही कर्मचारी तोंडी आदेशावर कार्यालयात बसून काम करीत आहे. हा प्रकार सीईओंच्या निदर्शनास येत नाही का, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. प्रतिनियुक्तीवर बाभुळगाववरून आलेल्या त्या कर्मचाऱ्यांकडेच गोपनीय अहवाल पाठवण्याचा टेबल आहे.

निव्वळ आश्वासनाची खैरात
आम्हीवारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, चर्चेअंती आम्हाला निव्वळ आश्वासनेच देण्यात आली आहेत. कुठल्याही प्रकारचे ठोस पावले अधिकाऱ्यांनी उचलले नाही. गोपनीय अहवालच अद्यापपर्यंत सापडले नसल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई अपेक्षित होते. ही कारवाई करण्यासही कुणीही धजावत नाही. -अशोक जयसिंगपूरे,सरचिटणीस, नर्सेस आरोग्य कर्मचारी संघटना.
बातम्या आणखी आहेत...