अमरावती - लहान बालकांच्या वाढत्या वयासोबतच वाढणारा पोलिओचा धोका आजच्या ‘दो बूँद जिंदगी के’ अभियानामुळे टाळला असून, रविवारी ७८ टक्के बालकांचे लसीकरण केल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. या अभियानाचा पुढचा टप्पा २१ फेब्रुवारी रोजी राबवला जाणार आहे.
गावापासून ते शहर आणि रेल्वे स्टेशन, बसस्थानकापासून ते सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक चौकांमध्ये पल्स पोलिओ लसीकरणाचे बुथ थाटले गेले होते. सकाळी ते सायंकाळी या वेळात हे अभियान राबवले गेले. त्यासाठी जिल्हाभरात ४१० पर्यवेक्षक आणि हजार ८०७ अधिकारी-कर्मचारी अशी हजार २१७ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्वांनी मिळून हे अभियान यशस्वी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते आशा वर्करपर्यंतच्या सर्वांचा त्यामध्ये समावेश होता.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अमरावती शहरात महापालिकेने ही जबाबदारी सांभाळली. त्यासाठी २६९ स्थायी, १५ ट्रांझीट, १९ मोबाइल आणि चेक पोस्ट, असे ३११ बुथ स्थापन करण्यात आले होते.
त्यासाठी ७७० अधिकारी-कर्मचारी आणि ५५ बुथ सुपरवायझर, असे सव्वा आठशे मनुष्यबळ व्यग्र होते. शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील सुमारे ६५ हजार ४२४ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे लक्ष्य या यंत्रणेसमोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७८ टक्के बालकांचे लसीकरण झाल्याचे मनपाच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे. अमरावती मनपाची हद्द वगळता जिल्हाव्यापी अभियानाचा प्रारंभ धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके यांनी सकाळी आठ वाजता केला.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे सीईओ सुनील पाटील, डीएचओ डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत, सीडीपीओ डॉ. संतोष माने, मनपाचे उपायुक्त चंदन पाटील मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी जातीने लक्ष ठेवून होते.
आणखी पाच दिवस चालणार
असे होते जिल्हास्तरीय नियोजन
लोकसंख्या(मनपा वगळता) २२,५४,१७९
घरे (ग्रामीण मनपा) ६,२३,५६५
ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थी १,८५,९२६
मनपा स्तरावरील लाभार्थी ६५,४२४
एकूण लसीकरण केंद्रे २२५६
ट्रान्झीट लसीकरण केंद्रे २१३
मोबाईल लसीकरण चमू २०१
ग्रामीणसाठीचे मनुष्यबळ ५२१७
मनपाचे एकूण मनुष्यबळ ८२५
^शहरात पाच, तर ग्रामीण भागात तीन दिवस घरभेटी होतील. डोस घेतल्याची खूण ज्या बालकांच्या बोटांवर दिसणार नाही, त्यांचे लसीकरण केले जाईल. डॉ. सुरेश आसोले, जिल्हाआरोग्य अधिकारी, अमरावती.