आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मृत्युमुखी ६० विद्यार्थ्यांच्या अनुदानाचे ‘ओझे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वेगवेगळ्यारस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अमरावती जिल्ह्यातील ६० शाळकरी विद्यार्थ्यांच्या परिवारांना अद्यापही राज्य सरकारकडून सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. मागील तीन वर्षांच्या कालखंडात अमरावती जिल्ह्यातील अपघातांमध्ये ६० शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील नवसारी भागात २७ सप्टेंबर २०१२ रोजी झालेल्या स्कूल व्हॅनच्या अपघातात सहा विद्यार्थी ठार झाले होते. यापैकी वलगावच्या सार्थक पंचारियाचे वडील प्रवीण यांनी मागील अडीच वर्षांत शासकीय कार्यालयाच्या कित्येक चकरा केल्या. मात्र, निधी नसल्याचेच सामायिक उत्तर प्रवीण पंचारिया यांना मिळाले. प्रवीण पंचारिया यांनी "दिव्य मराठी'कडे त्यांचे दु:ख हलके केले.

पंचारिया म्हणाले की, पोटचा पोर गेला साहेब. अनुदानाच्या रकमेकरिता एका शासकीय कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात चकरा मारणे सुरूच आहे. मात्र, एकच उत्तर मिळते, पैसा नाही. अचानक झालेल्या या आघाताच्या धक्क्यातून अद्यापही मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे माता-पिता सावरलेले नाही. अपघातात मुलगा गमावल्यामुळे पालकांची आशाच संपून जाते. जगात काहीच शिल्लक नसल्यासारखे वाटते. अशा आधार खुंटलेल्या शंभरहून अधिक माता-पित्यांच्या नशिबी अजूनही उपेक्षाच ओढवली आहे. त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी त्यांना चकरा माराव्या लागतात.

मुलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानाच्या रकमेकरीता जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवल्यानंतरही सरकारला या परिवारांची चिंता नसल्याचेच आता स्पष्ट झाले आहे.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत हे अनुदान राज्य सरकारमार्फत देण्यात येते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवाराला ७५ हजार रुपयांची मदत अनुदान स्वरूपात दिली जाते. तीन वर्षांतील या अपघातांमध्ये जिल्ह्यातील ६० विद्यार्थ्यांचे मृत्यू आणि दोन जणांचे अवयव निकामी झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूपोटी ४५ लाख रुपयांची रक्कम अद्यापही राज्य सरकारने दिलेली नाही. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले की, अनुदानाच्या रकमेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. पुरेसा निधी नसल्याने ही रक्कम देऊ शकत नाही. अनुदानाची रक्कम मिळताच वितरित करण्यात येईल.