आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राणा लॅन्डमार्क’वर सक्षम प्राधिकारी केला नियुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लॅन्डमार्कने शहरात सुलभ दरात फ्लॅट देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून रक्कम तर घेतली. मात्र, त्यांना मुदत संपल्यावरही फ्लॅट दिले नाहीत. शहरासह जिल्ह्यातील शेकडो नागरिकांकडून या व्यवहारात कोट्यवधी रुपये उकळले. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास केला. राणा लॅन्डमार्कची कोट्यवधींची मालमत्ता पोलिसांनी उघड केली आहे. याच मालमत्तेवर निर्णय घेऊन फसगत झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच अमरावतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
राणा लॅन्डमार्कने तीन वर्षांपूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये प्रदर्शन भरवून शहरातील विविध भागांत सुलभ आकर्षक दरात फ्लॅट देण्याबाबत माहिती दिली होती. बाजारभावापेक्षा राणा लॅन्डमार्ककडून मिळणाऱ्या फ्लॅटचे दर कमी असल्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांनी आपल्या स्वप्नातील घरांसाठी त्या ठिकाणी गर्दी केली. त्या वेळी फ्लॅट घेणाऱ्या इच्छुकाकडून काही प्रमाणात नोंदणी रक्कम राणा लॅन्डमार्कने घेतली, तसेच काही दिवसांनी एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम ही इसार म्हणून घेतली होती. जवळपास ही रक्कम प्रत्येकाकडून ते दीड लाखांच्या घरात होती. इसार घेतेवेळी त्या व्यक्तीसोबत करारनामा करण्यात आला होता. करारनाम्यावर दोन वर्षांत फ्लॅट तयार करून देण्यात येईल, असे सांगितले. मात्र, दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ग्राहकांना फ्लॅट मिळाले नाही.

दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार राणा लॅन्डमार्कच्या मालमत्तेचा लिलावसंदर्भात निर्णय घेऊन करून त्याद्वारे फसगत झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांनी सांगितले.

^आर्थिक गुन्हे शाखेने राणा लॅन्डमार्कची १८ कोटींची मालमत्ता उघड केली आहे. दरम्यान, आम्ही सक्षम प्राधिकारी नेमण्याबाबत विनंती केली होती. ती मान्य करून नुकतीच सक्षम प्राधिकारी म्हणून एसडीओंची नियुक्ती केली आहे. गणेशअणे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.

'श्री सूर्या' थंडबस्त्यात
श्रीसूर्यामध्ये सक्षम प्राधिकारी नेमण्याबाबत शासनाने उपविभागीय अधिकारी नागपूर अमरावती, असे दोन आदेश काढले आहे. या दोन आदेशामुळे नेमके सक्षम प्राधिकारी कोण? असा पेच निर्माण झाला होता. केवळ अमरावती की नागपूरचे उपविभागीय अधिकारी श्री सूर्यामध्ये सक्षम प्राधिकारी आहे? ही विचारणा पाच महिन्यांपूर्वी करूनही त्यावर शासनाने स्पष्टीकरण िदलेे नाही. त्यामुळे हे प्रकरण थंडबस्त्यात आहे.

साहेब, कधी मिळणार हो पैसे परत!
आयुष्यभर काम करून पैसा गोळा केला शहरात घर घेण्याचे स्वप्न असल्यामुळे राणा लॅन्डमार्कमध्ये फ्लॅटसाठी रक्कम भरली. मात्र, फ्लॅट नाही मिळाला किंवा ती रक्कमही नाही मिळाली. आयुष्यभर केलेल्या मेहनतीचा तो पैसा होता. अशा केविलवाण्या स्वरात एक वृद्ध दाम्पत्य नुकतेच पोलिसांकडे आले होते. असे अनेक फसलेले ग्राहक आर्थिक गुन्हे शाखेत येत असतात.