आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा, श्रेयसी, वैष्णवीचे सुरेख रोप मल्लखांब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मुलींच्या विभागीय रोप मल्लखांब स्पर्धेत रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळेच्या नेहा दारसिंबेने उत्कृष्ट कसब दाखवून ६.४५ गुणांसह १४ वर्षांखालील गटाचे अजिंक्यपद पटकावले. १७ वर्षांखालील गटात नारायणदास लढ्ढा हायस्कूलच्या श्रेयसी भडांगेने उत्कृष्ट आसनं सादर करून गुणांसह विजेतेपदावर ताबा मिळवला, तर १९ वर्षांखालील विभागात इंडो पब्लिक स्कूलच्या वैष्णवी जहागीरदारने दोराच्या आधारे अप्रतिम कला सादर करून ७.२५ गुणांची कमाई करत किताब मिळवला. या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषदेच्या अधिपत्याखाली तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा उपसंचालक डाॅ. जयप्रकाश दुबळे, क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या मार्गदर्शनात मल्लखांब प्रशिक्षक विलास दलाल आणि राजेंद्र नागपुरे यांच्या तांत्रिक संयोजनात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मल्लखांब केंद्रावर झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या १४ वर्षांखालील गटात भंवरीलाल सामरा हायस्कूलच्या निर्मल जावरेनेही देखणा रोप मल्लखांब सादर करून गुणांसह उपविजेतेपद पटकावले. सहकार विद्या मंदिरच्या कल्पना इंगळेने ५.८५ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला तर रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळेच्या अर्चना दहीकरने ५.६० गुण मिळवून चौथ्या क्रमांकावर समाधान मानले.

समृद्धीडहाकेला उपविजेतेपद
मुलींच्या१९ वर्षांखालील गटात नूतन कन्या विद्यालयाच्या समृद्धी डहाकेने ६.९७ गुण संपादन करताना दोरावर सुरेख आसनं सादर केली. त्यामुळे तिला उपविजेतेपद मिळाले. रामकृष्ण क्रीडा विद्यालयाच्या काजल बघेलनेही देखणे कर्तब सादर करून ५.२७ गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. श्री. अ. खि. नॅशनल ज्युनिअर काॅलेजच्या श्रुती बडेरेने ५.२७ गुण मिळवून चौथ्या क्रमांकावर समाधान मानले.

गुणांच्या आधारे ठरते पात्रता
रोपमल्लखांब या खेळातील विभागीय स्पर्धेत प्रत्येक गटातील महिला खेळाडूसाठी पात्रता गुण ठरवले असतात त्या खेळाडूने किमान तेवढे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले तरच तिला किंवा त्याला प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक बहाल केला जातो. जसे. १९ वर्षांखालील गटात जर प्रथम क्रमांकासाठी ७.२५ गुण ठरवले असतील तर किमान तेवढे गुण त्या खेळाडूने मिळवायला हवेत.

रोप मल्लखांब चित्तथरारक
मुलांसाठी खांबावरील तर मुलींसाठी दोराचा मल्लखांब हा प्रकार असतो. जाड दोरावर चढळून तो अंगाभोवती गुंडाळून त्यावर वेगवेगळे आसनं आणि चित्तथरारक कसरती करायच्या असतात. बघणाऱ्यांना मुली खाली तर पडणार नाही, असे काही क्षण वाटते. मात्र, दोरी अंग पायात अशी काही मजबुतीने पकडून ठेवली जाते की त्या आधारे या मुली अगदी कौशल्याने आपला तोल सांभाळतात. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात नूतन कन्या शाळेच्या कल्याणी खंडेझोडने ६.६० गुणांच्या बळावर कांस्यपदक जिंकले. नूतन कन्या शाळेच्या श्रद्धा कैथवासला ५.६५ गुणांसह चौथा क्रमांक मिळाला.