अमरावती - संसाधनांचा वापर विकास केल्यास विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोरील अनेक समस्या सुटतील. त्यामुळे संसाधनातून परीक्षा विभाग बळकट करण्याबाबत शिफारशी डॉ. राजेश अग्रवाल समितीने केल्या आहेत.
नियमित कर्मचारी, विद्याशाखांमध्ये क्षमता निर्माण तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असण्याच्या शिफारशी समितीकडून अहवालात केल्या आहेत. या महत्वपूर्ण शिफारशींकडे वेळीच लक्ष दिले असते तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला गुणवाढ प्रकरणाचा कलंक टाळता आला असता.
महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्याबाबत डॉ. राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुक्ष्म अभ्यास करीत अहवाल तयार केला आहे. परीक्षा प्रणालीसमोरील समस्यांचे आकलन करीत विविध ४३ प्रकारच्या शिफारशी समितीने केल्या आहेत. संसाधनांचे बळकटीकरण हा देखील महत्वपूर्ण विषय असून, यामध्ये प्रामुख्याने तीन शिफारशी केल्या. विद्यापीठातील परीक्षा विभागाचे बळकटीकरण करणे, विविध विद्याशाखांचे आधुनिक तंत्रज्ञान हाताळण्यासाठी क्षमता निर्माण करणे त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर करणारे कुशल कर्मचाऱ्यांनी सुसज्ज राहणे आदी तीन शिफारशींचा यामध्ये समावेश आहे. संसाधनांच्या दृष्टिने तीनच शिफारशी केल्या असल्या तरी वर्तमान प्रणालीत फार परीणामकारक बदल करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. डॉ. राजेश अग्रवाल समितीकडून नोव्हेंबर २०१२ रोजी हा अहवाल राज्यपालंाना सादर केला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने २२ जुलै २०१३ राज्यातील सर्व विद्यापीठांना समितीच्या शिफारशींवर अंमल करण्याचे आदेश दिले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने देखील केवळ एक समिती गठीत करण्याखेरीज काहीच केले नाही,अशी माहिती आहे. समितीकडून देखील बैठका घेत या शिफारशी लागू करण्याबाबत पुढाकार घेणे गरजेचे होते; मात्र समितीचे देखील पुढे काय झाले हे गुलदस्त्यात आहे.
समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाला प्राप्त झाले, मात्र शासनाचे पत्र प्राधिकारणींसाेबत विविध विभागात फिरत राहिले. परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्याचे शासनाचे आदेश असताना विद्यार्थ्यांचे गुणवाढ करण्याचे गंभीर प्रकरण विद्यापीठात उघडकीस आले. कदाचित अग्रवाल समितीच्या शिफारशींवर अंमल केला असता तर गुणवाढ प्रकरणाचा कंलक देखील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर लागला नसता. गुणवाढ प्रकरण उघडकीस येऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील विद्यापीठाकडून अद्याप बदलाबाबत चर्चा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आरोग्य विद्यापीठात होतात प्रशिक्षण
महाराष्ट्रराज्य आरोग्य विद्यापीठाने ‘मेडीकल एज्युकेशनल टेक्नालॉजी सेल’ गठीत केला आहे. हा सेल प्रत्येक महाविद्यालय, विभागीय केंद्र तसेच मुख्यालयात सतत विद्याशाखांमध्ये प्रशिक्षणाचे अायोजन करते. नेहमी होणाऱ्या प्रशिक्षणांमुळे अभ्यासक्रमातील बदलांची माहिती शिक्षकांना होत राहते. त्याचा शिक्षण तसेच मूल्यांकन करण्यामध्ये मोठा उपयोग होतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात देखील सर्व विद्याशाखांमध्ये क्षमता निर्माण केल्यास निश्चित बदल दिसून येईल.
पुणे विद्यापीठामध्ये कंत्राटी कर्मचारी नाही
पुणेविद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून परीक्षा विभागातील कामे करवून घेतली जात नाहीत. परीक्षा विभागातील कामे नियमित कर्मचाऱ्यांकडून घेतली जात असताना देखील त्याचा यंत्रणेवर परीणाम होत नाही. आयसीटी प्रणालीचा वापर करीत नियमित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परीक्षा विभागातील कार्यास गती आणणे शक्य असल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र विद्यापीठात परीक्षांचे नियंत्रण मूल्यांकन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर टाकले आहे.
तीन शिफारशी
>विद्यापीठातील परीक्षा विभागाचे बळकटीकरण.
>विविध विद्याशाखांचे आधुनिक तंत्रज्ञान हाताळण्यासाठी क्षमता निर्माण करणे.
>आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर करणारे कुशल कर्मचाऱ्यांनी सुसज्ज राहणे