शिरखेड- दुचाकीने रोहीच्या मांसाचे तुकडे घेऊन जाणाऱ्या इनेश श्रीचंद भोसले गजेंद्र राजू पवार रा. वारूळी, ता. चांदूर बाजार या दोन आरोपींना विष्णोरा येथे अटक करण्यात आली.
शिरखेड वनपरिक्षेत्रात येत असलेल्या विष्णोरा येथील स्मशानभूमीजवळ गावकऱ्यांनी दुचाकीने (क्रमांक एमएच २७-के-३८३१) जाणाऱ्या दोन्ही आरोपींना अडवले. त्यांची झडती घेतली असता गावकऱ्यांना त्यांच्याजवळ मांसाचे तुकडे आढळले. गावकऱ्यांनी घटनेची माहिती त्वरित शिरखेड वनपरिक्षेत्र अधिकारी ए. व्ही. चिंचाळकर यांना दिली. वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून दोन्ही आरोपींना अटक केली. मांसाचे तुकडे दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, मांसाचे तुकडे रोहीचे असून, आपण ते यावली येथील सर्मेश नमली पवार या सासऱ्याकडून आणल्याचे आरोपींनी सांगितले.
परंतु, हे मांसाचे तुकडे नेमके कोणत्या प्राण्याचे आहे याची तपासणी करण्यासाठी ते नागपूर येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरच मांस नेमके कशाचे आहे हे स्पष्ट होणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई मोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. दगडे, एन. एम. श्रीखंडे, एम. एस. जंगले, व्ही. व्ही. कोहळे, एम. डी. पानडे आदी कर्मचारी उपस्थित होते.