आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सरल’ नव्हे, ही तर अडथळ्यांची शर्यत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शाळांचा ऑनलाइन डाटा बेस तयार करणारी सरल प्रणाली जिल्ह्यातील शिक्षण विभागात अडथळ्यांची शर्यत ठरत आहे. ९० टक्के शाळांकडून मागील वेळेस माहिती सरल प्रणालीत भरण्यात आली. मात्र, प्रणालीमध्ये चुकीची माहिती दिसून येत असल्याने मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली आहे. सरल प्रणालीतील हा घोळ दूर करण्याकरिता संधी मिळाली आहे. अंतिम संधी म्हणून १५ ते २१ डिसेंबरदम्यान सरल प्रणालीचे संकेतस्थळ सुरू केले जाणार अाहे.
शिक्षण विभागातील संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सरल प्रणाली राबवल्या जात आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात यामध्ये शाळेतील संपूर्ण माहिती भरण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, विनाअनुदानित सर्व शाळांना या प्रणालीमध्ये माहिती भरणे बंधनकारक होते. एकाच वेळी संपूर्ण राज्यभर माहिती भरल्या जात असल्याने सुरुवातीला संकेतस्थळ काम करत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर महसूल विभागनिहाय माहिती भरण्याबाबत वेळापत्रकदेखील निश्चित करण्यात आले होते. यादरम्यान शाळांच्या मुख्याध्यापकांकडून माहिती भरण्याचे कार्य करण्यात आले. बहुतांश शाळांकडून माहिती भरण्यात आली. मात्र, परत माहिती तपासली असता ती चुकीची आढळून येत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. या प्रणालीमध्ये माहिती भरताना ती चुकीची भरण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. राज्याच्या शिक्षण विभागाकडे चुकीची माहिती जाऊ नये, ज्यांनी डाटा बेस केला नाही, त्यांना माहिती भरता यावी म्हणून ही अंतिम संधी देण्यात आली आहे. शिक्षक, विद्यार्थी, शाळा कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन उपलब्ध व्हावी म्हणून शासनाकडून ‘सरल’ अर्थात स्कूल डाटा बेस संगणक प्रणाली उपक्रम राबवला जात आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रीतसर प्रक्रिया राबवून शैक्षणिक संस्थांची नोंदणी केली जाणार आहे. मान्यताप्राप्त शाळांकडे असलेल्या यूआयडी संकेतावरून माहिती भरली जाणार आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना आय.डी. क्रमांक मिळेल.

कामकाजाची गती वाढेल
^शाळेतील प्रत्येक घटकाची माहितीचे डाटा बेस सरल या ऑनलाइन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून केले जात आहे. शैक्षणिक योजना राबवायची असेल तर शाळास्तरावरून माहिती मागवावी लागत होती ती राज्य शासनापर्यंत पोहोचवावी लागत होती. संगणकीय डाटा बेस तयार होणार असल्याने राज्य शासनापर्यंत माहिती पोहोचवण्यास वेळ लागणार नाही. एका क्लिकवर मुंबईला माहिती पाहता येणार आहे. त्यामुळे शासनास शैक्षणिक धोरण ठरवणे सुविधाजनक होईल, शिवाय कामकाजास गती मिळेल. डॉ. श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी(प्राथ.)अम.

शिक्षकांना लाभ
शिक्षक कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके प्रणालीनुसार राहणार आहे. प्रशिक्षणविषयक गरजा निश्चित करणे, सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करणे, अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागांसाठी समायोजन करणे या प्रणालीमुळे शक्य होणार आहे. शाळांमध्ये असलेल्या पदांचा तपशील, याच माहितीच्या आधारे पदभरती तसेच सर्व कार्यरत शिक्षकांचे नियुक्ती आदेश, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, सेवानिवृत्तीचे लाभ, वारसदार आदींची संपूर्ण माहिती प्रणालीमध्ये राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...