आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सायन्सकोर’वर कचरा टाकल्यास ‘एफआयआर’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराच्या हृदयस्थानी असलेले ऐतिहासिक सायन्सकोर मैदान कचऱ्यापासून मुक्त ठेवण्यासाठी आता या मैदानावर कचरा, मातीचे ढीग टाकणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेने प्रथमच घेतला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी नुकतीच मैदानाला भेट देऊन डम्पिंग ग्राऊंड सदृश स्थिती बघितली. त्यानंतर जि.प.अध्यक्षांनी शिक्षण विभागाला कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. आता जिल्हा परिषदेने कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध उचललेले पाऊल मैदान विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू शकते, असे मत या मैदानाबद्दल कळकळ असणाऱ्यांनी व्यक्त केले आहे.  

जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेले हे शहरातील सर्वात मोठे लाख १७ हजार चौरस फुटाच्या मैदान गेल्या चार दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या तर ते डम्पिंग ग्राऊंड बनले आहे. या मैदानाचा विकास व्हावा म्हणून अनेक आंदोलनं झाली, मैदान बचाव आंदोलन कृती समितीने गेल्या पाच वर्षांत अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने दिली. मात्र त्याचा काहीएक फायदा झाला नाही. सायन्सकोर मैदान खेळासाठी राखून ठेवण्यात आले असले तरी या मैदानाचा वापर सर्रास सभा, संमेलनं, प्रदर्शनी, मेळे, सर्कस यासाठी केला जातो. यांच्याकडून खड्डे बुजवण्याची तसेच कचरा करण्याची हमी घेतली तरी काम झाले की ते कोणालाही जुमानत नाही. त्यामुळे दिवसंदिवस मैदानाची स्थिती फारच घाणेरडी होत चालली आहे. याशिवाय परिसरातील व्यापारी, फेरीवाले तसेच इतर लोक येथेच कचरा टाकत असतात.सद्यस्थितीत येथे पारधी बेड्यांचा वावर असून तेही मैदानाला घाण करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीत. यांचाही बंदोबस्त व्हायला हवा. जर मैदानावरील खड्डे नुयमित बुजवण्यात आले तसेच कचरा काढून ते समतल करण्यात आले तर त्याचा फायदा खेळाडूंसह ज्येष्ठांना फिरण्यासाठीही होऊ शकतो. येथे सभाेवताल आतील बाजुला बसण्याचे बाक बसवण्यात आले तर अनेकांना येथे मोकळी हवाही घेता येईल. 

शहराचे सौंदर्य, आरोग्य, खेळ, खेळाडू मोकळेपणासाठी सायन्सकोरचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोबतच येथे जिल्हा परिषदेची शाळाही आहे. बहुतांश वेळा या मैदानाचा वापर हा चांगल्या कामांसाठी होतच नाही. येथे भांडणं, मारामाऱ्या, वाद एवढेच नव्हे तर खुनही झाले आहे. मैदानावर सुरक्षेची उपाययोजना नसल्यामुळे समाज विघातकांचे फावते. सर्वत्र दारुच्या बाटल्यांचा खच आणि काचांचे तुकडेही पडलेले िदसतात. त्यामुळे खेळाडूंच्या पायांना दुखापत झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच या मैदानाचा विकास व्हावा असे मत आ. डाॅ. सुनील देशमुख, सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक, मैदान बचाव आंदोलन कृती समितीचे प्रमुख अॅड. यशवंत शेरेकर यांनी व्यक्त केले आहे. 

मैदानावर सुधारणांची नितांत आवश्यकता 
सद्या मैदानाच्या सभोवताल बांधण्यात आलेली संरक्षण भिंत जागोजागी पडली असल्यामुळे तिची दुरुस्ती आणि उंची वाढवण्याची आवश्यकता असून मैदानावरील सर्वच दरवाजांची दुरुस्ती आवश्यक आहे. सर्व द्वारांवर शिपायांची नियुक्ती केल्यास कोणतेही वाहन थेट आत शिरणार नाही. 

मैदानाचे शाॅपिंग सेंटर नावाने केले आरक्षण 
हे मैदान आधी खेळांसाठी राखीव होते. त्यामुळे फुटबाॅल मैदानाएवढी जागा सोडली आहे. परंतु, त्यासाठी नेहमीच मैदान झाडून स्वच्छ करावे लागते. मनपाच्या नगर रचना विभागाने मंजुर विकास योजना (सु.) मध्ये हे मैदान वि.यो.(सु.) आ.क्र.२०८ स्टेिडयम, शाॅपिंग सेंटर नावाने आरक्षित केले आहे. 

विकासावर चर्चा 
सायन्सकोरच्या विकासाबाबत जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणेे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. किरण कुळकर्णी, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. मैदान सुस्थितीत असावे म्हणून बीओटी तत्त्वावर पुढे गाळे आतील भागात खेळाचे मैदान तयार केले जाणार आहे. त्यामुळे मैदानही सुरक्षित राहणार आहे. 

शिक्षण विभागाला दिले कारवाईचे निर्देश 
^मी सायन्सकोर मैदानावर कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले असून, मैदानाची दुरवस्था पाहता लवकरच मैदानाच्या विकासाकरिता आवश्यक ती पावले उचलली जातील. नितीन गोंडाणेे, अध्यक्ष जि.प. 
 
बातम्या आणखी आहेत...