अमरावती - ‘मरेपर्यंत फाशी’ (हँग टिल डेथ) हा शब्दप्रयोग एका निष्णात अमरावतीकर वकिलामुळे केला गेला, हे अनेकांना माहीत नसेल; परंतु स्वातंत्र्यसैनिक श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या युक्तिवादानंतरच कायद्यातील हा बदल अस्तित्वात आला, हे खरे आहे. इंग्रजांच्या काळात दोन किंवा तीन मिनिटांपर्यंत फाशी अशा पद्धतीचा कायदा होता. इंडियन लॉ रिपोर्टरमध्ये (आयएलआर) तशी नोंदही आहे. त्या कायद्यानुसार एका आरोपीला तीन मिनिटांपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या अारोपीचे वकीलपत्र बॅरिस्टर खापर्डे यांनी घेतले होते. कायद्यातील तरतूद आणि भारतीय ऋषी-मुनींनी रूढ केलेल्या योगा व प्राणायामाची ताकद याआधारे ही फाशी आपण वाचवू शकतो, याची त्यांना दाट खात्री होती. त्यामुळे ‘फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले, तरी मी तुला वाचवणारच,’ असे ते छातीठोकपणे सांगत होते. मात्र, आरोपी व त्याच्या कुटुंबीयांचाही यावर विश्वास बसत नव्हता; परंतु दादासाहेब मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम होते.
न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा कायम केल्यानंतर प्रत्यक्ष फाशी देण्याच्या तारखेत काही दिवसांचे अंतर होते. याच काळात दादासाहेबांनी न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन आरोपीला दररोज अर्धा तास डाॅक्टरांसह भेटण्याची मुभा मिळवली. या भेटीच्या वेळी ते आरोपीला प्राणायाम व योगाचे महत्त्व पटवून देत. याद्वारे श्वासावर नियंत्रण मिळवण्याचे कसब आरोपीला शिकवले गेले. हे प्रशिक्षण तीन मिनिटांपेक्षा जास्त काळ श्वास कसा रोखायचा, या स्थितीपर्यंत पोहोचले आणि अखेर आरोपीने तेवढा काळा श्वास रोखला म्हणून त्याची फाशी टळली, अशी माहिती शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रकांत डोरले यांनी दिली. दादासाहेबांच्या युक्तिवादाने आरोपीचा मृत्यू टळल्यामुळे पुढे हे प्रकरण इंग्रजांना बरेच गांभीर्याने घ्यावे लागले. त्यामुळे आधीचे शब्दप्रयोग बदलून तत्कालीन कायद्यात ‘मरेपर्यंत फाशी’ अशी दुरुस्ती केली गेली. तो कायदा अजूनही सुरू आहे.