आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरी वस्तीत प्राणी घुसले घरांत; सामान्यांचा जीव पडला घाेरात..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एकामांजराने घरात खेळणाऱ्या एका चिमुकलीच्या बोटाचा चावा घेतला, एका माकडाने चक्क स्वयंपाकघरात घुसखोरी करत खाण्याचे पदार्थ साऱ्यांसमोर लांबवले, इतकेच काय तर रस्त्यावर मोकाट संचार करणाऱ्या कुत्रे आणि माकडांच्या कळपांनी अमरावतीकरांना मागील काही दिवसांपासून हैराण केले आहे. या घटना शहरात वारंवार घडत आहेत. आपण याकडे फार मोठी घटना नाही म्हणत दुर्लक्ष करतोय खरं. परंतु, प्राण्यांमधील हे बदल काही वन्यजीव तज्ज्ञांना गंभीर विचारात टाकणारे वाटत आहेत.

अन्नाची कमी होत चाललेली उपलब्धता, पाण्याचे दुर्भिक्ष या साऱ्या कारणांमुळे अगदी मांजरापासून ते माकडापर्यंत सर्वच प्राणी धोकादायक बनत चालले असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. तसेच सध्या पावसाने ताण दिल्याने शेती शिवारात असलेले दाणी पाणी कमी झाले आहे. शेत शिवारात माकडांना खाण्यासाठी काही नसल्याने माकडांच्या झुंडीच्या झुडी शहरी भागातील वस्त्यांमध्ये आल्याचे दिसून येते.

असेमिळवता येऊ शकते नियंत्रण
श्वानांच्या(कुत्री) नसबंदीचा कार्यक्रम गांभीर्याने राबवून, वराह पालन फार्म सक्तीचा करून, तसेच वानरांना खाद्य पदार्थ देण्याचे टाळून तसेच वन विभागाकरवी त्यांचा कायमचा बंदोबस्त लावून आणि इतर प्राणी जसे मांजरींना घरात प्रवेश करू देण्याची सवय लावून काही प्रमाणात या त्रासापासून दिलासा मिळू शकतो. माकडं कचऱ्याचे ढीग, रिकाम्या इमारतीत किंवा ज्या झाडांवर राहतात तेथून त्यांना सतत काही दिवस पळवून लावले, तर ते शहरात शिरण्याची हिंमतच करणार नाहीत, असे मत प्राणी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

माकडांना आपणच सवय लावली
धार्मिक ठिकाणांवर किंवा परिसरांमध्ये माकडांना खाण्याची सवय लावण्यात आली. त्यामुळे आयते अन्न मिळते म्हणून ते शहरात यायला लागले. सहज मिळाले नाही की, घरात शिरून किंवा हिसकावून खातात.

मांजरीने घेतला बालिकेच्या बोटाला चावा
माकडांची मजल गेली घरातील पदार्थ लांबवण्यापर्यंत
पिसाळलेल्या कुत्र्यांनी मध्यरात्री वाहनचालकाला पाडले
मागील काही दिवसांत शहरात झालेल्या तीन प्रमुख घटना
मांजर निरुपद्रवी प्राणी म्हणून आजवर त्याच्याकडे बघितले जायचे. मात्र, आता त्यांच्यातही क्रौर्य निर्माण झाले आहे. सतत अन्नाच्या शोधात एका घरातून दुसऱ्या घरी जाणाऱ्या एका मांजराने गडगडेश्वर मंदिराजवळील पुष्पक कॉलनी भागात एका घरात खेळत असलेल्या दोन वर्षीय बालिकेच्या बोटालाच कडकडून चावा घेऊन त्याचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला. उपचारावर हजारो रुपये खर्च करावे लागले. आजवर घरातील खाद्य, दूध लांबवणारी मांजरं आता मनुष्यांवरही हल्ले चढवायला लागल्याचे हे एकच उदाहरण नाही. अशाच काही घटना आधीही घडल्या आहेत.

माकडांच्या टोळक्याने गाडगेनगर, राजापेठ भागातील काही घरांमध्ये अगदी मागच्या दारातून स्वयंपाक घरात शिरून तयार अन्न, टेबलवरील फळे लांबवण्याच्या घटना जुन्या नाहीत. गाडगेनगर परिसरातील एका घरात रविवारी सर्व एकत्रितपणे भोजन करत असताना एका मोठ्या माकडाने अचानक मागच्या बाजूने घरात शिरून सर्वांना घाबरवून टाकले. त्याने एका युवतीच्या हातातील पदार्थ ओढून घेतला तसेच तिला चांगलेच ओरबडले. हल्ली माकडेही हिंस्त्र झाल्याचे दिसून येत आहे. चालत्या वाहनांवर माकडांनी उड्या मारण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात.

अमरावती शहरातील प्रभात कॉलनी, गणेश कॉलनी भागात दोन दिवसांपूर्वी रात्री दुचाकीवरून घराकडे निघालेल्या मध्यमवयीन व्यक्तीच्या अंगावर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. त्यामुळे ही व्यक्ती घाबरली. त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून ते खाली कोसळले. यात त्यांचे पाय हाताला जबर दुखापत झाली. परिसरातील युवकांनी त्यांना पत्ता विचारून आधी डॉक्टरांकडे नेले नंतर घरी पोहोचवले. डॉक्टरांनी त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान केले. रात्री घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना तर कुत्र्यांच्या त्रासाला सामारे जावे लागते.
केवळ प्राणीदया या एका बाजूचा विचार करून चालणार नाही

शहरातीलमोकाट प्राण्यांचा मनुष्यांना उपद्रव वाढत असल्यामुळे केवळ एकाच बाजूचा विचार करून चालणार नाही. प्राण्यांवर नियंत्रण हा निसर्गाचा नियम आहे. केवळ प्राणीदया ही एक बाजू धरून चालणार नाही, असेसे मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...