आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत अमरावती; आयुक्तांचे मुंबईत "प्रेझेंटेशन'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘स्मार्टसिटी’ प्रकल्पात अमरावतीला समाविष्ट करण्याचा विडा उचललेल्या आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बुधवारी मुंबईत प्रेझेंटेशन केले. राज्य शासनाच्या सहसचिव सीमा ढमढेरे इतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीसमोर त्यांची मांडणी प्रभावी झाल्याची माहिती आहे.
या घडामोडीमुळे अमरावतीचा स्मार्ट होण्याच्या दृष्टीने सुरू असलेला प्रवास अधिक घट्ट झाला असून, जुलैअखेर केल्या जाणाऱ्या स्मार्ट शहरांच्या निवडीच्या घोषणेत अमरावतीचे स्थान पक्के होण्याची शक्यताही बळावली आहे. दोन दिवसांपूर्वीच महापालिकेने स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला होता. शासनाने नेमून दिलेल्या प्रपत्रात तो तंतोतंत बसल्याने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना आज सकाळीच विमानाने मुंबईला जावे लागले. दरम्यान, प्रेझेंटेशन आटोपून उशिरा सायंकाळी रेल्वेने त्यांचा परतीचा प्रवासही सुरू झाला आहे.

अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’ हे नामाभिधान मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली असून, तसा प्रस्ताव शुक्रवारीच शासनाला सादर केला होता. या प्रस्तावात मनपाचे एकूण ‘व्हिजन’ प्रतिबिंबित झाले असून, आतापर्यंत झालेली तयारी भविष्यात केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना स्पष्ट झाल्या आहेत. दरम्यान, २० जुलैच्या आमसभेत विषय क्रमांक ६५ नुसार दरवर्षी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा विषयही मंजूर झाला आहे. तर दिल्लीत झालेल्या कार्यशाळेतून परतल्यानंतर महापौर चरणजितकौर नंदा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत भाग घेण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार ११ पानांचा मुद्देनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाची आज बैठक : गुरुवारीमुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असून, त्यात स्मार्ट सिटीसाठी निवडल्या जाणाऱ्या शहरांना २५ टक्के मदत करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय असून, २८-२९ जुलैला राज्य शासनातर्फे शहरांची घोषणा केली जाणार असून आयुक्तांना मुंबईस जावे लागणार आहे.

मनपाने अर्थसंकल्प केला सार्वजनिक
नागरिकांनासेवेची हमी मिळावी म्हणून राज्यातील सर्व मनपांना आपापला अर्थसंकल्प सार्वजनिकरीत्या घोषित करावा लागतो. यानुसार मनपा प्रशासनानेही अशी कृती केली आहे. २०१५-१६ चा अर्थसंकल्प नेटवरून सर्वांपर्यंत पोहोचला आहे. स्मार्ट सिटीसाठी शासनाने पाठवलेल्या प्रपत्रात हे ठळकपणे विचारण्यात आले होते. मात्र, मनपाने त्यापूर्वीच ही भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीसाठी लागणारा आमसभेचा प्रस्तावही मनपाने यापूर्वीच पारित केला असून, आर्थिक तरतुदीवर दोन दिवसांपूर्वीच्या आमसभेत शिक्कामोर्तब केले आहे.

काय असेल ‘स्मार्ट सिटी’मध्ये? : स्मार्टिसटीच्या प्रस्तावामध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयांची बांधणी, नागरिकांच्या तक्रारींची ऑनलाइन सोडवणूक, डिजिटल पद्धतीच्या मासिक पत्रिकेचे प्रकाशन, सेवा देण्यास विलंब झाल्यास स्वत:वर दंड लावून घेण्याची हमी, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अदायगी, पुरेशा पाण्याची उपलब्धता, करवसुली.

निवड होण्याची आशा पल्लवित
आजच्या प्रेझेंटेशननंतर ‘स्मार्ट सिटी’त समाविष्ट होण्याची अमरावतीची शक्यता ९० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढली आहे. शासनाच्या अटीनुसार मनपाला दरवर्षी ५० कोटी रुपये खर्च करावयाचे आहे. तसा ठरावही २० जुलैच्या आमसभेने केला आहे. त्यामुळे जुलैअखेर होणाऱ्या शहरांच्या घोषणेत अमरावती असेलच, याबाबत मी निश्चिंत आहे. चंद्रकांतगुडेवार, आयुक्त, महापालिका, अमरावती.