आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचा ‘मेक वे फॉर अॅम्ब्युलन्स’ उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रुग्णवाहिकेला प्राधान्याने मार्ग देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने मेक वे फॉर अॅम्ब्युलन्स ही मोहीम राबवण्यात येत आहे. रस्त्यांवरील वाहनांच्या कोंडीमुळे अनेक वेळा आपत्कालीन परिस्थिती आेढावते. दरम्यान, रुग्णवाहिकेला मार्ग मिळाल्याने अनेक जण दगावल्याचे प्रकार घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असून, महामंडळाने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

सध्या प्रत्येक जिल्ह्यात १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध आहे. दरम्यान, या मोहिमेअंतर्गत राज्य परिवहन चालकांचेच नव्हे तर रस्त्यावरील इतर वाहनांच्या चालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. यादृष्टीने महामंडळाचे विशेष स्टिकर्स एसटीवर लावण्यात येणार आहे. मुंबईपासून या मोहिमेला प्रारंभ झाला असून, पुढे राज्यात टप्प्याटप्प्यात ही मोहीम राबवली जाईल. या मोहिमेमुळे प्रवाशांसह रस्त्यावरून जाणाऱ्या इतर चालकांमध्ये जनजागृती करणे हाच यामागील एक उद्देश असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. जेणेकरून रुग्णवाहिकेतील रुग्णांचे प्राण कशाप्रकारे वाचवता येईल, यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रुग्णवाहिकेला मिळेल प्राधान्य
रुग्णवाहिकेला प्राधान्याने मार्ग द्या, वाहन डावीकडे घेऊन हळू चालवा, प्राण वाचवण्यासाठी सहकार्य करा, असा संदेश या स्टिकर्सवर देण्यात आला आहे. महामंडळाच्या बसेसवर लावलेल्या स्टिकर्सवर हा संदेश वाचून वाहनचालक रुग्णवाहिकेला प्राधान्याने मार्ग देतील, जीव वाचवण्यास मदत करतील, हा यामागील हेतू आहे. यासाठी चालकांना प्रशिक्षण केंद्रातून याचे प्रशिक्षण दिले जाईल. स्टिकर्सद्वारे याची जनजागृती होणार आहे. अॅम्ब्युलन्समधील रुग्णांचे प्राण कसे वाचेल, हाच यामागील एक मुख्य उद्देश् असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या स्टिकर्स प्राप्त व्हायचे आहे
^सेंट्रल कार्यालयातून जरी मोहीम सुरू झाली असेल, तरी विभागाला स्टिकर्स प्राप्त व्हायचे आहे. एसटीकडून हे स्टिकर्स दिले जात नसून एका खासगी कंपनीला याचा ठेका देण्यात आला आहे. तीच कंपनी या स्टिकर्सचे वितरण करते. विभागाला स्टिकर्स प्राप्त झाले तर कर्मचाऱ्यांना तसे आदेश देऊन याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या स्टिकरमुळे निश्चितच चालकांचे तसेच इतर घटकांचेही प्रबोधन होईल.'' के.एम. महाजन, विभागीय नियंत्रक.