आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारंजा बहिरम नाक्यावर पकडला मोहफुलाचा ट्रक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात मोहफूल घेऊन आलेला एक ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. ८) रात्री वाजताच्या दरम्यान कारंजा बहिरम नाक्यावर पकडला. या ट्रकमध्ये असलेल्या मोहफुलाबाबत कोणत्याही प्रकारचे कागदपत्रं नसल्यामुळे पथकाने ट्रकसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच वेळी एकाला अटक करण्यात आली आहे. अशोक बालकिसन मालवी (५५, रा. मालवी, शहापूर, बैतूल) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
मध्य प्रदेशमधून एक ट्रक (क्रमांक एमपी ०४ एचई १३८) मोहफूल घेऊन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कारंजा बहिरम येथील आरटीओ चेकपोस्टवर सापळा रचला होता. रात्री वाजताच्या सुमारास हा ट्रक येताच त्याला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये ट्रक भरून मोहफूल असल्याचे दिसले.

मोहफूल जप्त, तपास सुरू
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आलेला ट्रक जप्त केला आहे. त्यामध्ये मोहफूल आहे. सदर मोहफुलाबाबत चालकाकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रं उपलब्ध नाहीत. त्यामुळे ट्रकचालक ट्रकमालकाविरुद्ध गुन्हे दाखल करून चालकाला अटक केली.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.माहिती घेणे सुरू आहे. संजय देशमुख, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अमरावती.

कारंजा लाडला घेऊन जायचे होते मोहफूल
अमरावतीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडलेला मोहफुलाचा ट्रक कारंजा लाड येथे घेऊन जायचा होता, असे ट्रकचालकाने राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सांगितले आहे. मात्र, कारंजा लाड येथे मोहफूल कोणाला द्यायचे होते, याची माहिती ट्रकचालकाला नाही. ट्रकचालकाला रविवारी न्यायालयात हजर केले होते. तपासादरम्यान हा माल कारंजा येथे कोणासाठी जात होता, याची माहिती घेणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.