आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा ‘आधार’ हरवला!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विद्यार्थ्यांचाआधार हरवला तर नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. बायोमेट्रिक हजेरीसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. हजेरीसाठी अनिवार्य असले तरी आधार कार्ड काढावे कोठे?, असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. आधार नोंदणीसाठी सेतू केंद्रात चकरा मारण्याची वेळ विद्यार्थी-पालकांवर आली आहे. विद्यार्थ्यांच्या ‘आधार’साठी कोठे मनस्ताप, तर कोठे लुबाडणूकदेखील पालकांना सहन करावी लागत आहे.

सर्व विद्यार्थ्यांची पटसंख्या मोजण्यासाठी आता शाळेत बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे आधार कार्ड निघताच त्यांची लिंक दिली जाणार अाहे. ई-लर्निंगद्वारे हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ई-लर्निंग प्रकल्पासाठी आधार कार्ड गरजेचे असले, तरी त्याच्या नोंदणीसाठी पालकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. शाळांमध्ये आधार नोंदणी शिबिर नसल्याने पालकांना खासगी सेतू केंद्रांवर धाव घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होत असून, विद्यार्थी पालकांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. मोजक्याच सेतू केंद्रांवर आधार नोंदणी केली जात असल्याने तेथूनदेखील अनेक पालकांना हुसकावून लावण्याचे प्रकार समोर आले आहे. नागरिकांकडून होत असलेल्या गर्दीचा फायदा घेत सेतू केंद्रांकडून पालकांची आर्थिक लुबाडणूकदेखील होत असल्याचे प्रकार समोर आले आहे.

विद्यार्थ्यांची आधार लिंक शोधताना पालकांची मात्र दमछाक होत असल्याचे चित्र सद्य:स्थितीत शहरात पाहावयास मिळत आहे. सेतू केंद्रातील लांब रांग, तर वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने पालकांचेदेखील मानसिक खच्चीकरण होत आहे. शिवाय अनेक पालकांवर रोजगार सोडून विद्यार्थ्यांचा आधार शोधण्याची वेळ आली आहे. २०११ मध्ये पटपडताळणी झाल्यानंतर अनेक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी संख्या दाखवण्याचा प्रकार उघडकीस अाला. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शाळांमधील पटसंख्या नोंदणीसाठी ‘डाइज’चा उपयोग केला.

यात राज्यातील सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांनी आपली विद्यार्थी संख्या, शिक्षक आणि शाळा स्थितीची माहिती टाकणे अनिवार्य करण्यात आले. याशिवाय शाळांमध्ये ई-लर्निंगवर भर देण्यात आला. यातून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यावर भर देण्यात आला, मागील वर्ष भरापासून आधार नोंदणीची मोहीम सुरू आहे. शाळा बंद झाल्यानंतर मोहीम बंद करण्यात आली. शाळा आरंभ झाल्यानंतरदेखील मोहीम आरंभ करण्यात आल्याने त्याचा फटका विद्यार्थी-पालकांना बसतो आहे.

आधार कार्ड अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांची सेतूत शाळा भरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सेतू केंद्रांवर गर्दी असल्याने एका दिवसात आधार कार्ड काढता येईल, अशी स्थिती राहिलेली नाही. शिवाय शाळांमध्ये शिबिरांचे आयोजन नसल्याने विद्यार्थ्यांनादेखील शाळेऐवजी सेतू केंद्रांवर जाण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड येताच शिक्षकांकडून हजेरीचे कार्य काढून घेतले जाईल. कार्यालयाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी शाळेत लावलेल्या बायोमेट्रिक मशीनद्वारे करण्यात येईल. बायोमेट्रिक मशीनला आधार कार्ड लिंक केल्या जाणार आहे. शाळेत येताच विद्यार्थ्याला आधार कार्ड त्या मशीनला दाखवावे लागेल. ते दाखवताच आधार क्रमांक त्याचा फोटो दिसेल, शिवाय त्याची लिंक पालकाच्या मोबाइलवर असल्याने विद्यार्थी शाळेत आल्याची माहिती मिळेल.

मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी पालकांची सेतू केंद्रांवर अशी गर्दी होत आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यात असे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...