आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये आता ‘विसावा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर रुग्णासोबत आलेल्या त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात कुठे थांबावे, हा मोठा प्रश्न असतो. हीच बाब हेरून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सर्वच सुविधायुक्त ‘विसावा’ इमारत उभारण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे आैचित्य साधून या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री तथा राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुनील देशमुख होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, नगरसेवक संजय अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण यादव, डॉ. राजीव जामठे आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एच. निकम आदी उपस्थित होते.

या इमारतीत एक एलसीडी टीव्ही लावला आहे. यासोबतच साउंड सिस्टिमच्या माध्यमातून म्युझिक थेरपीही होईल. बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना जलाराम पाणपोईचे सेवक शरद जोशी सहकारी मोफत जेवण देणार आहे. युनियन बँकेने आपल्या फंडातून साउंड सिस्टिम रुग्णालयाला भेट दिली आहे. ‘विसावा’ इमारतीत नातेवाइकांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी एका निनावी देणगीदाराने वीस लॉकर्स उपलब्ध करून दिले आहे. यासोबतच कापड व्यावसायिक हरिकिसन राठी यांनी नातेवाइकांचे मनोरंजन करण्यासाठी एलसीडी टीव्ही भेट दिला आहे. प्रास्ताविक डाॅ. श्यामसुंदर निकम यांनी केले, तर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सतीश वडनेरकर यांनी संचालन करून आभार मानले. या वेळी रुग्णालयाचे डॉ. भिलावेकर, डॉ. कल्पना भागवत, बी. आर. राणे, राजेंद्र काळे, विनोद पाटील, नवनाथ सरवदे आदी उपस्थित होते.

काय म्हणाले मान्यवर..
सुपरस्पेशालिटी रुग्णालय हे शहरातील खासगी रुग्णालयांपेक्षा उत्तम दर्जाचे आहे. येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना रुग्णांप्रति आस्था आहे. साफसफाईसोबतच या नवीन उपक्रमाचा आदर्श इतर रुग्णालयाने राबवावा, असे आवाहन पालकमंत्री पोटे यांनी केले. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या फेज-२ चे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. रुग्णालयातील पदभरती, उपकरणे साहित्य यासंदर्भात मुख्यमंकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच येत्या दोन महिन्यांत या रुग्णालयाचे लोकार्पण केले जाईल, अशी ग्वाही आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी या वेळी दिली.