आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसील कार्यालयातील ‘मस्टर’ गायब? तहसीलदाराकडून कारवाईचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे हजेरी बुक (मस्टर) गायब झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला. कार्यालयाची वेळ झाल्यानंतर हजेरी बुक दिसत नसल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. तहसीलदार सुरेश बगळे यांनी इशारावजा कडक सूचना दिल्याने तासाभरात हजेरी बुक सापडल्याचा प्रकार आज (६ नोव्हेंबर) उघडकीस अाला.
तहसीलदार सुरेश बगळे यांच्या कक्षाला लागून असलेल्या कार्यालयात सकाळी आल्यानंतर हजेरी बुक नसल्याची बाब निदर्शनास आली. तहसीलदार सुरेश बगळे यांनीदेखील कर्मचाऱ्यांचे हजेरी बुक तपासण्यासाठी मागवले. मात्र, बराच वेळ झाल्यानंतर हजेरी बुक आल्याने त्यांनी माहिती घेतली असता, हा प्रकार निदर्शनास आला. तहसील कार्यालय हे महसूल विभागाचे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आहे. नागरिकांच्या वैयक्तिक तसेच मालमत्तेच्या नोंदी येथे असून, विविध प्रमाणपत्रांच्या नोंदीदेखील या कार्यालयात होतात.

अत्यंत महत्त्वपूर्ण दस्तावेज असलेल्या कार्यालयातून हजेरी बुक दिसण्याच्या प्रकाराला तहसीलदार सुरेश बगळे यांनी गांभीर्याने घेतले. तातडीने कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक बोलावत हजेरी बुक शोधण्याबाबत निर्देश दिले. एका तासामध्ये हजेरी बुक शोधल्यास कारवाई करण्याची ताकीददेखील त्यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांना दिली. तहसीलदारांनी ताकीद दिल्यानंतर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडून शोधाशोध मोहीम आरंभ करण्यात आली. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर फाइल्सच्या गठ्ठ्यांमध्ये हजेरी बुक आढळून आले. हजेरी बुक सापडल्याने कर्मचाऱ्यांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला.

हजेरी बुक सापडले
हजेरीबुक दिसत नसल्याचा प्रकार सकाळी कार्यालयात घडला. शोधण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. शोधाशोध केल्यानंतर हजेरी बुक फाइल्सच्या गठ्ठ्यामध्ये दबलेले असल्याचे आढळून आले. तहसील कार्यालय लोकाभिमुख असल्याने येथे येणाऱ्यांची संख्या जास्त असते. गर्दी वाढल्यास नागरिकांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही, त्यामुळे संपूर्ण दस्तऐवजांची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. -सुरेश बगळे,तहसीलदार