आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकर्सच्या निविदांना इंटरनेटचा अडथळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हॉकर्सची मोजदाद आणि त्यांना बायोमेट्रिक कार्ड्स देण्याबाबतच्या निविदा पुन्हा एका दिवसासाठी लांबणीवर पडल्या आहेत. आज, सोमवारी सकाळी या निविदा उघडल्या जाणार होत्या. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्या उघडल्या गेल्या नाहीत. दरम्यान, इंटरनेटची स्थिती बदलल्यानंतर उद्या, मंगळवारी दुपारी त्या उघडल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील रस्त्यांच्या कडेला वेगवेगळ्या चौकात उभे राहून व्यवसाय सांभाळणाऱ्या फेरीवाल्यांना निश्चित ओळख मिळवून देण्यासाठी मनपाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी काही जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. विशिष्ट दिवशी ठरावीक वेळेला त्यांना व्यवसाय करता यावा, अशी नवी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे.

मात्र, तत्पूर्वी शहरात फेरीवाले किती, त्यांच्या व्यवसायांचे वर्गीकरण कसे, ते कोठे कोठे व्यवसाय करतात, कोणत्या ठिकाणी कोणता माल विकला जातो, व्यवसाय करणारांची ज्येष्ठता किती वर्षांची आदी मुद्दे निकाली निघावेत म्हणून त्यांची मोजदाद करून त्यांना ओळखपत्र देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. गेल्या १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान ह्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. ई-टेंडरिंग पद्धतीने मागवण्यात आलेल्या या निविदांची संख्या त्या उघडल्या जातात, तेव्हाच कळत असल्याने त्यांची नेमकी संख्या कळली नाही. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही बाब आज सकाळी उघड होणार होती. परंतु, सर्व्हर डाऊन असल्यामुळे ही बाब एक दिवसासाठी पुढे ढकलली गेली आहे. शहरात २५ हजारांवर हॉकर्स आहेत. फळे, भाजीपाला, छोटी भांडी, खेळणी, दूध-दही, स्टेशनरी-कटलरी, गृहोपयोगी वस्तू, रांगोळी, पूजेचे साहित्य, लोहा-लोखंडाच्या जुन्या वस्तू, वृत्तपत्रे वह्या-पुस्तकांची रद्दी अशा अनेक चीज-वस्तूंची विक्री या माध्यमातून केली जाते. नागरिकांना त्यांच्या दारावरच ही सुविधा उपलब्ध होत असल्याने राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू केले आहे.
अमरावतीतही ते लागू करावे, अशी फेरीवाल्यांची जुनीच मागणी आहे. त्याची पूर्तता म्हणूनच मनपाने हे पाऊल उचलले आहे.

व्यवसाय सुटसुटीत होणार
फेरीवाल्यांसाठीचेराष्ट्रीय धोरण अमरावतीत लागू केल्याने त्यांचे व्यवसाय सुटसुटीत होणार आहेत. शिवाय नागरिकांनाही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी वस्तू उपलब्ध होतील. त्यासाठी लवकरच हॉकर्सची मोजदाद करून त्यांची बायोमेट्रिक नोंदणी केली जाणारआहे. निविदा उघड झाल्या की लगेच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

^सर्व्हर डाऊन असल्यामुळे ठरलेल्या वेळापत्रकानुसार आज, सोमवारी निविदा उघडल्या गेल्या नाहीत. इंटरनेटची ही स्थिती उद्या बदलेल, असे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्या, मंगळवारी दुपारी वाजता उपायुक्तांच्या कार्यालयात निविदा उघडल्या जाणार आहेत. गजानन साठे, प्रभारी अधीक्षक, बाजार परवाना विभाग, मनपा, अमरावती.