आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलाचा निधी परत जाण्याच्या मार्गावर; अधिकारी मात्र उदासीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी - निराधारांना हक्काचे छत मिळावे म्हणून शासनाच्या वतीने राजीव गांधी घरकुल योजना राबवण्यात येत आहेत. परंतु तालुक्यातील काळगव्हाण येथील दिलीप जांभुळकर यांना मात्र सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतरही अद्याप अतिक्रमित जागेत राहावे लागत आहे. प्रशासकीय यंत्रणा जबाबदारी झटकत असल्याने आलेला निधीही परत जाण्याची वेळ आली आहे.

काळगव्हाण येथील रहिवासी असलेले जांभूळकर हे दारिद्र्य रेषेखाली येतात. राजीव गांधी योजनेतून हक्काचे घरकुल मिळावे म्हणून त्यांनी शासनाकडे अर्ज केला. तो मंजूर झाल्याचे त्याना आॅगस्ट २०१० मध्ये पत्र आले. त्या अनुषंगाने जांभूळकर यांनी तहसील कार्यालयात जागा मिळण्यासाठी रीतसर अर्जही केला. प्लॉट क्र. ४६ (३० बाय ५०) त्यांना मंजूर झाला. त्यासाठी २० हजार ४४५ रुपयांचा भरणा शासन दरबारी केला. त्यानंतर प्लॉट मोजून देण्यासाठी त्यांनी वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मार्च २०१४ मध्ये मंडळ अधिकारी यांनी प्लॉटची मोजणी केली. प्लॉट उत्तर-दक्षिण ५० फुट पूर्व पश्चिम ३० फुट असल्याचे लक्षात आल्यानंतर जी फॉर्ममध्ये सुधारणा झाल्याशिवाय प्लॉटचा ताबा देऊ शकत नाही, असे अधिकाऱ्यांकडून त्यांना कळवण्यात आले. तहसीलदार यांनी फॉर्ममध्ये सुधारणा करून जांभुळकर यांना जागेचा ताबा देण्याचे आदेश संबंधितांना दिले. मात्र या जागेवर प्लॉटच्या मोजणीचे निशाण नसल्यामुळे ती जागा मोजणी विभागाकडून मोजण्याचे आदेश दिले. जांभुळकर यांनी भूमिअभिलेख कार्यालयाकडे जागा मोजणीबाबत अर्ज केला असता जागेची मोजणी करू शकत नाही, असे कळवलेे.

जांभुळकर यांना घरकुल योजनेच्या बांधकामाचा पहिला हप्ता मार्च २०१५ मध्ये मिळाला. गटविकास अधिकारी यांनी त्यांना घरकुलाच्या बांधकामाला सुरुवात केल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. हक्काचे घरकुल मिळावे जांभुळकर यांना तीन कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. परंतु अद्याप घरकुल मिळाले नाही.

लवकरच जागा उपलब्ध होईल
^चारदिवसां पूर्वीच मंडळ अधिकारी यांना जांभुळकर यांची जागा मोजून देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत, परंतु जागेवर अतिक्रमण असल्याने जांभूळकर यांनी पोलिस संरक्षण घ्यावे, असे त्यांना कळवले आहे. लवकरच त्यांना जागा उपलब्ध होईल.'' सुदर्शन शहारे, नायब तहसीलदार.