आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना जमिनीला भाव, ना वारसांना रोजगार, शेतक-याचा जिल्‍हाकचेरीत विष घेण्‍याचा प्रयत्‍न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आमच्या जमिनी अत्यंत कमी दरात हस्तगत केल्या. जमिनीच्या मोबदल्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दुसरीकडे रतन इंडिया बुल कंपनीत आमच्या वारसांना रोजगार मिळवण्यासाठी प्रचंड हेलपाटे घ्यावे लागत आहे. वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली. मरणाच्या दारावर येऊन ठेपलो आहे, तरीदेखील शासन न्याय द्यायला तयार नाही. मग जगून काय फायदा, असा संताप व्यक्त करत एका हतबल शेतकऱ्याने प्रसारमाध्यमांसमोरच विषाक्त द्रव्याची बॉटल काढून सर्वांदेखत आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी जिल्हा कचेरी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून थकलेल्या व्यथित झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी रामकृष्ण पारवे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

एमआयडीसी नांदगावपेठ येथील शेतकऱ्यांची जमीन ही इंडिया बुल या कंपनीने घेतली असून, त्यांना अद्यापही मोबदला मिळाला नसल्याचे प्रवीण मनोहरे यांनी सांगितले. शासनाकडून केवळ तारीख देण्यात येत असून, कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी अखेर राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. यासंदर्भात या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. प्रवीण मनोहरे यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, जिल्हाधिकारी परिसराच्या बाहेरच शंभर फुटांवर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून आंदोलनकर्त्यांना अडवले. मनोहरे यांच्यासोबत पाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली. या वेळी आंदोलनात रामचंद्र खंडारे, आेंकार नाईक, श्रीकृष्ण मंगळे, रघुनाथ आठवले, हिंमत खंडारे, अर्जुन मनोहरे, पुंडलिक कावरे याशिवाय इतर पन्नासच्यावर प्रकल्पग्रस्त शेतकरी या वेळी उपस्थित होते.

इच्छा मरणाची केली मागणी : प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी नांदगावपेठ एमआयडीसी येथील प्रकल्पग्रस्तांनी सुरुवातीला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून कार्यवाहीचे आश्वासन दिले. यानंतर प्रकल्पग्रस्तांनी आपला मोर्चा पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडे वळवला.तेथे स्वीय सहायकांना निवेदन दिले.या निवेदनात या प्रकल्पग्रस्त कास्तकारांनी प्रशासनाला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, का केला शेतक-याने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न..