आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दुकान पाडले; आणखी दोन रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सामाजिक आरोग्य बिघडविणारी बाब म्हणून रामपुरी कॅम्पमधील देशी दारुचे दुकान शुक्रवारी पाडण्यात आले. या यशस्वी कारवाईनंतर मनपाने आपली वक्रदृष्टी आता विलासनगर कठोरा नाका भागातील दुकानांकडे वळवली आहे.
‘शहरातील चार देशी दारु दुकानांविरुद्ध लढा’या शिर्षकांतर्गत ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारच्या अंकात याबाबतचे विस्तृत वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही कारवाई झाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. रामपुरी कॅम्प, विलासनगर, कठोरा नाका नवसारी या चार भागांतील दारु दुकाने हटविण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यापैकी विलासनगर रामपुरी कॅम्प भागातील दुकानांच्याविरोधात थेट त्या-त्या वार्डांच्या नगरसेवकांनीही कंबर कसली होती. मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आणि लोकप्रतिनिधी अशा सर्वच आघाड्यांवर नागरिकांनी हा मुद्दा लावून धरला होता.

दरम्यान दारु दुकान हटविणे किंवा बंद करणे हा मनपाच्या अखत्यारितील मुद्दा नसला तरी त्या दुकानाचे बांधकाम वैध की अवैध हा मुद्दा मात्र मनपाच्या कक्षेतील आहे.

आता विलासनगर, कठोरा नाका चर्चेत
रामपुरी कॅम्पची कारवाई पूर्ण झाल्यानंतर विलासनगर कठोरा नाका या दोन्ही दुकानांचे बांधकाम पाडण्याचे आदेशही आयुक्तांनी जारी केले. मनपाच्या पाहणीनुसार सदर दोन्ही दुकानांचे बांधकाम रस्त्यावर अाले आहे. शिवाय नागरिकांच्या तक्रारीही आहेत. त्यामुळे ही बाब त्वरेने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागही कारवाईत
दुकानाचे बांधकाम पाडण्यापूर्वी दुकानात असलेली दारु रितसर पंचनामा करुन हलवावी लागते. त्यामुळे ही कारवाई केली जाण्यापूर्वीच गुरुवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून लायसन्सधारकाद्वारे दारुची विल्हेवाट लावून घेतली.