आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात चार ठिकाणी पुन्हा देशी दारूविरोधात लढा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - देशीदारूच्या दुकानांमुळे उद््भवणारा त्रास संपवण्यासाठी शहरात चार ठिकाणी नागरिकांनी लढा उभारला अाहे. परंतु, शासनाच्या चौकटबद्ध निर्णयामुळे हा लढा बारगळण्याचीच शक्यता अधिक आहे. विलासनगर, रामपुरी कॅम्प, कठोरा नाका नवसारी या चार भागातील नागरिक देशी दारूच्या विक्रीमुळे त्रस्त आहेत. येथील दारू दुकानांमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून, नागरिकांनी विशेषत: महिलांनी त्याविरुद्ध कंबर कसली आहे. वेळ आल्यास शासनाशी दोन हात करावे लागले तरी चालेल, मात्र लढा जिंकायचाच, अशी गर्जना त्यांनी केली आहे.
परंतु, ज्या खात्याला ही दुकाने बंद करावयाची आहे, त्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने तिन्ही ठिकाणच्या तक्रारींना उत्तरे पाठवून नागरिकांची मागणी कशी अपूर्ण आहे, हे पटवून देण्यासाठी नेहमीचाच फंडा वापरला आहे. आपल्या तक्रारीतील काही महिलांची स्वाक्षरी अस्पष्ट आहेत. सह्यांची एकूण संख्या ही शासनादेशात म्हटल्यापेक्षा कमी आहे. सदर दुकानाची लांबी ही मंदिर आणि शाळांपासून पाहिजे त्यापेक्षा जास्त अंतरावर आहे, असे मुद्दे या उत्तरांमध्ये दडले आहेत. नागरिकांचा क्षोभ ओढवला जाऊ नये म्हणून दारू दुकाने बंद करण्यासंदर्भात राज्य शासनाने २००८ साली तयार केलेल्या कायद्याची प्रतही सोबत पाठवली आहे.

विशेष असे की चारपैकी विलासनगर रामपुरी कॅम्प या दोन ठिकाणच्या आंदोलनांमध्ये त्या-त्या भागातील नगरसेवक रेखा तायवाडे, भूषण बनसोड प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांचाही सक्रिय सहभाग आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी प्रा. डॉ. दंदे यांच्या नेतृत्वात थेट जिल्हा कचेरीवर मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र, दारू दुकाने बंद करण्याबाबत असलेला तकलादू शासनादेश आणि प्रशासकीय यंत्रणेची बोटचेपी भूमिका यामुळे हा लढा अद्याप यशाकडे पोहोचला नाही. दरम्यान, चारही ठिकाणच्या नागरिकांनी पुन्हा योग्य मोर्चेबांधणीला प्रारंभ केला असून, सामाजिकदृष्ट्या कीड ठरलेली ही दुकाने बंद करण्याचा चंग बांधला आहे.

मनपाने दाखवला आशेचा किरण : दारूदुकाने बंद करण्याची मागणी उत्पादन शुल्क विभागाच्या कायदेशीर चौकटीत बसणारी असल्यामुळे नागरिकांनी आपला मोर्चा महापालिकेकडे वळवला असून, त्यांना सकारात्मक प्रतिसादही लाभला आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रामपुरी कॅम्प विलासनगर या दोन्ही भागातील दुकानांच्या इमारतींची वैधता तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी रामपुरी कॅम्पमधील दुकान चक्क अतिक्रमणात असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर विलासनगरच्या दुकानाचे बांधकामही परवानगीपेक्षा अधिक केल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन दुकानांचा मुद्दा पालिकास्तरावरच निकाली निघेल, अशी शक्यता आहे. ही दोन्ही दुकाने १९७२ च्या आधीपासून सुरू असली तरी उत्पादन शुल्क विभागाने लायसन्सधारक वापरत असलेली जागा आजतागायत तपासली नाही.

तक्रारी पुन्हा तपासू
^विलासनगर रामपुरीकॅम्प भागातील नागरिकांच्या तक्रारींवर कायदेशीर उत्तर कळवले आहे. नवसारी कठोरा नाका भागातील तक्रारी अाल्या असतील तर त्याही तपासून पाहू. एस. एन. केडिया, निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, अमरावती.

पाठपुरावा करणारच
^दारूदुकान हटवण्याबद्दलची तक्रार कायदेशीर पळवाटांचा बळी ठरणार नाही, याची काळजी माझ्यासह नागरिक घेत आहेत. प्रसंगी लढा प्रखर करू, मात्र सामाजिक आरोग्य िबघडवणाऱ्या या प्रकाराला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रा.डॉ. प्रदीप दंदे, नगरसेवक.
दारू दुकाने बंद करण्याच्या आंदोलनाला खीळ घालणारा हाच तो शासनादेश