आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक शाखेच्या ५२ पोलिसांना "शोकॉज'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. त्यामुळेच वाहतूक शाखेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यासंदर्भात त्यांना वारंवार सूचनाही दिल्यात. मात्र, ज्या पोलिसांनी अजूनही कामात सुधारणा केली नाही अशा ५२ पोलिसांना जाब विचारण्यासाठी शोकॉज नोटीस बजावल्या असल्याचे पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी बुधवारी सांगितले.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फ्रेजरपुरा, गाडगेनगर राजापेठ असे तीन वाहतूक विभाग करण्यात आले. या विभागांसाठी अधिकाऱ्यांसह जवळपास १५५ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. जून, जुलै, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आम्ही सातत्याने वाहतुकीचा आढावा घेत होतो. तसेच वाहतूक शाखेच्या अधिकारी पोलिसांना कामात सुधारणा करण्याच्या सातत्याने सूचना देण्यात येत होत्या. कामातील कर्मचाऱ्यांना काही अडचणी असतील किंवा त्यांना काही सूचना देण्यासाठी मध्यंतरी तीन दिवस टप्प्याटप्याने सर्व वाहतूक पोलिसांना आयुक्तालयात बोलवून त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर पुन्हा १५ ऑक्टोबरपर्यंत केलेल्या कारवाईचा सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्या वेळी तिन्ही वाहतूक शाखेतील ५२ जणांची कामगिरी अपेक्षित नव्हती. त्याच ठिकाणी १०२ जणांनी समाधानकारक काम केलेले आहे. त्यामुळे अपेक्षित कर्तव्य बजावणाऱ्या ५२ जणांना शोकॉज नोटीस देऊन त्यांना जाब विचारण्यात आलेला आहे. वाहतूक पोलिसांना कारवाईचे टार्गेट आपणाकडून देण्यात आले काय? असे पोलिस आयुक्तांना विचारले असता, त्यांनी सांगितले, मी कोणत्याही प्रकारचे कारवाईचे टार्गेट कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत, असेही पेालिस आयुक्तांनी सांगितले.

अनेकदा पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी विनंती अर्जाद्वारे मुख्यालय किंवा नियंत्रण कक्षामध्ये बदली मागतात, मात्र कोणालाही बदली देण्यात येणार नाही. त्याच ठिकाणी काम करावे लागेल, जो काम करणार नाही, त्याच्यावर योग्य वेळी योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना जर कारवाई करताना राजकीय व्यक्तींचे फोन येत असतील, तर त्यांनी थेट मला फोन करून सांगावे, त्या राजकीय व्यक्तींना उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे. असे कर्मचारी अधिकाऱ्यांनासुद्धा सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तव्य चोखपणे बजावणे अपेक्षित आहे.