यवतमाळ- शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीजजोडण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन जोडण्या तातडीने देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही जोडण्या देण्याचे काम पाहिजे ज्या गतीने होत नाही. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रलंबित जोडण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तब्बल दहा हजार ६५२ जोडण्या अद्यापही शिल्लकच राहिलेल्या आहेत.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. तब्बल पाच तास चाललेल्या या दीर्घ बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक बाबींवर नाराजी व्यक्त करीत कामात गती आणि पारदर्शकता आणण्याचे निर्देश कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला कंपनीचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशासन अशोक मोहोड, यवतमाळचे कार्यकारी अभियंता अनिल घोगरे, पुसदचे धनराज बिक्कड, पांढरकवडाचे कार्यकारी अभियंता उदय कोंडावार यांच्यासह कंपनीचे जिल्ह्यातील सर्व उपकार्यकारी अभियंता तसेच उपविभागीय अभियंते उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यात दौरा केला होता. या वेळी विविध विभागांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणीत आणू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीसुद्धा प्रशासकीय कामकाज अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही त्रस्त झाले आहे. महसूल आणि ग्रामविकास विभागात केलेल्या थोड्याफार बदलामुळे अधिकारी, कर्मचारी आदींच्या कामात सुधारणा झाली आहे. तरीसुद्धा उर्वरित विभागाने कामकाज सुधारलेच नाही. या प्रकारामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिल्ह्याला वीजजोडण्या तातडीने देता याव्या म्हणून शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांची स्थिती पाहता त्यांना वीजजोडणी तातडीने दिली गेल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. कालबद्ध कार्यक्रम राबवून तातडीने जोडण्या देण्याचे आदेश कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. गेल्या तीन महिन्यांत जूनपर्यंत ४३७ जोडण्या देण्यात आल्या असून, दहा हजार ६५२ जोडण्या अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे आता याबाबत लवकर कार्यवाही करावी लागणार आहे.
ट्रान्सफार्मरबिघडल्यास पर्यायी व्यवस्था ठेवा : जिल्हाधिकाऱ्यांनीधडक सिंचन विहिरींवर देण्यात येणाऱ्या जोडणीचाही आढावा घेतला. ट्रान्सफार्मर जळाल्याने वीज खंडित होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होतात. पावसाने खंड दिल्यामुळे सिंचनासाठी विद्युत प्रवाह आवश्यक आहे. अशात ट्रान्सफार्मरमुळे शेतकऱ्यांना अडचण होऊ नये. त्यामुळे ट्रान्सफार्मर जळाल्यास तातडीने दुरुस्त करून किंवा दुसरे लावल्या जावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारींकडे विशेष लक्ष द्या
वीजपुरवठातसेच वीज बिलाबाबतही अनेक तक्रारी येतात. नागरिकांच्या तक्रारींची वेळेत योग्य दखल घेतली गेली पाहिजे. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे बिलकूल खपवून घेतले जाणार नाही. प्रत्येक ग्राहकाशी सौजन्याने वागा, त्यांची तक्रार, अडचण आत्मियतेने समजून घेण्याचा सल्लाही कंपनीच्या सर्व अभियंत्यांना दिला. या वेळी वीजजोडण्यांसह वीज केंद्र, वीज वाहिन्या, ट्रान्सफार्मर, कंपनीच्या पायाभूत सुविधा, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आदींचा आढावाही घेतला. सचिंद्रप्रताप सिंह, जिल्हाधिकारी.
जिल्हाधिकाऱ्यांची वितरणाच्या कामकाजावर नाराजीजोडण्यांबाबतराज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ दौऱ्यावर असताना स्वतंत्र आढावा घेतला होता. तसेच वीजमंत्र्यांनीही स्वतंत्र बैठक घेऊन जोडण्या तातडीने देण्याचे निर्देश दिले होते. असे असताना जोडण्या देण्याची गती पाहता ती फार कमी असल्याचे दिसून येते, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.