आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनशे रुपयांची लाच घेताना दोन वैद्यकीय अधिकारी ट्रॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीश बाबरे - Divya Marathi
सतीश बाबरे
अमरावती - पगाराचे बिल मंजूर करून पाठवल्याच्या मोबदल्यात ३०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.३१) सापळा रचून दोन वैद्यकीय अधिकारी यांना रंगेहात पकडले. डॉ. विजय रामराव तायडे (५२, सर्वोदय कॉलनी, काँग्रेसनगर रोड) सतीश शांताराम बाबरे (५०, रा. सुंदरलाल चौक, चपराशीपुरा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन वैद्यकीय अधिकारी यांची नावे आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय तायडे आरोग्य सहायक सतीश बाबरे हे दोघेही मंगरुळ चव्हाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. दरम्यान, तक्रारदार यांचे तीन महिन्यांचे पगार बिल मंजूर करून देण्यासाठी डॉ. तायडे यांनी फिर्यादीकडे ३०० रुपयांची मागणी केली. याप्रकरणी आरोग्य सहायक असलेले बाबरे यांनी तक्रारदार यांना पैसे देण्यास प्रोत्साहित केले होते. पैसे देण्यासाठी ३१ जुलै हा दिवस ठरला होता. त्यानुसार तक्रारदार हे सकाळीच प्राथमिक आरोग्य केंद्रात पैसे देण्यासाठी येणार होते. दरम्यान, एसीबीचे पथक घटनास्थळी सापळा रचून होते. डॉ. तायडे यांनी तक्रारदाराला आपल्या दालनात बोलावून ३०० रुपयांची लाच घेतली. त्याच वेळी एसीबी पथकांनी त्यांना रंगेहात पकडले. सकाळी साडेनऊ वाजता पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर नांदगाव खंडेश्वर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक राजेश गवळी, पोलिस निरीक्षक राहुल शिरे आणि कर्मचारी सहायक पोलिस उपनिरीक्षक कैलास सानप, पोहेकॉ श्रीकृष्ण तालन, नापोकॉ अक्षय हरणे, पो.कॉ. अभय वाघ, धीरज िबरोले, चालक जाकीर खान यांनी पार पाडली. पुढील कारवाई सुरू आहे.