आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनवासींच्या विकासातील अडथळा हटवा, होऊ नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेळघाट, अमरावती - राज्यातील जंगलात असलेल्या वनवासींच्या विकासाच्या मध्ये काही अडसर येत असेल तर आदिवासी जनता आणि विकासात येत असलेला अडथळा हटवून आपणही काही मार्ग काढला पाहिजे, असा सरकारला सल्ला देत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंचावर उपस्थित असलेल्या राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या शुक्रवारी अमरावती जिल्ह्यात चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. या वेळी मंचावर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित होते. दूर हटले पाहिजे म्हणजे वनवासींच्या विकासातून कायद्याचे अडसर दूर केले पाहिजे, असे सरसंघचालकांना सुचवायचे होते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात असलेल्या कोठा या गावी एका कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. जंगलाचे मालक आदिवासी जनता असल्याचेही सरसंघचालकांनी आवर्जून सांगितले. जंगलाचे मालक असलेल्या आदिवासींबद्दल बोलताना सरसंघचालक यांनी राज्य सरकारला सल्ला दिला की, ब्रिटिशांच्या काळात जंगलाचे मालक आदिवासी म्हणजेच वनवासी जनता होती. मात्र, देश स्वतंत्र झाल्यानंतर जंगलांवर आदिवासीचा हक्क नाही. मेळघाटात संपूर्ण बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून वनवासींना रोजगार देण्याचा प्रयत्न सुनील देशपांडे आणि निरूपमा देशपांडे यांनी केला आहे. मात्र, मेळघाटात याकरिता पुरेसा बांबू आणि पायाभूत सुविधा उपलब्घ होणार आहे का? होणार नसेल तर आपण वनवासींना काहीही कमी पडू दिले नाही पाहिजे. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. याकरिता आपला अडथळा येत असेल तर वनवासींच्या आणि विकासाच्या मधून आपण हटले पाहिजे, असा खोचक सल्ला सरसंघचालकांनी वनमंत्र्यांना दिला. या वेळी त्यांनी सिकंदर भारतात आला होता त्या वेळचे एक उदाहरणही दिले. जाचक अटी आणि कायद्यांमुळे जंगलाचे मालक असलेली वनवासी जनता जंगल सोडून जंगलाच्या बाहेर पळणार नाही याचीदक्षता घ्या, असेही सरसंघचालकांनी सुचवले.

कारागिरांच्या कल्याणासाठी कार्यरत
मागील २० वर्षांपासून मेळघाटातील लवादा गावात सुनील देशपांडे आणि निरूपमा देशपांडे मेळघाटातील कारागिरांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. त्यांनी संपूर्ण बांबू कलेच्या माध्यमाने धारणी, चिखलदरा तालुक्यातील असंघटित बांबू कलाकारांना संघटित केले, तर बांबू कलेला आधुनिक कलेची झालर देऊन आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत वेणूकलाकृती पोहोचवल्या आहेत. धारणीपासून २५ किमी अंतरावर कोठा गाव शिवारात सुनील देशपांडे यांनी मेळघाटातील बांबू कला, लोहारी तंत्रज्ञान, कुंभार आणि सेंद्रिय शेतीबाबत स्थानिक आदिवासींना असलेल्या परंपरागत तंत्रज्ञानाच्या संरक्षणासाठी या ग्राम ज्ञानपीठाची स्थापना केली आहे. कोठा गावाच्या निसर्गरम्य स्थानावर हट्स, यज्ञ मंडप, सभा मंडप, रंगमंच, शिदोरी कक्ष, स्वागत द्वार, स्वयंपाक कक्ष, वाचनालय, माहिती संस्कृती, परिचय कक्ष स्थानिक ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले आहे. या ठिकाणी ग्रामज्ञान आणि विविध तंत्रज्ञानाची माहिती मार्गदर्शन पर्यटकांना देण्याची विशेष सुविधा करण्यात आलेली आहे.

पर्यावरणीय भविष्यासाठी ग्रामज्ञान, कला, तांत्रिक परंपरा आणि मेळघाटाच्या आदिवासी परंपरेतील वैज्ञानिक पद्धतीच्या रितीरिवाजांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी धारणीजवळच्या कोठा गावाजवळ सुनील देशपांडे यांच्या संकल्पनेतून देशातल्या पहिल्या ‘ग्राम ज्ञानपीठाची’ स्थापना करण्यात आली आहे. शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ग्राम ज्ञानपीठाचे लोकार्पण करण्यात आले. तेथे परिसरातल्या ३६ गावांतील प्रमुखांशी सरसंघचालकांनी संवाद साधला. तसेच अन्य काही प्रमुख मंडळींशी त्यांनी चर्चा केली. मेळघाटातील पंचायत व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण घटक असलेल्या आडा पटेलसह इतर पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.