आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरखेडमध्ये होणार कचऱ्याचे सोने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड - प्लास्टिकमुक्ती सारखामहत्त्वाचा विषय हाती घेणाऱ्या उमरखेड नगर परिषदेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चमूने औरंगाबादेतील विविध प्रकल्पांना भेट दिली. तज्ज्ञांकडून कचरा व्यवस्थापनातील बारकावे समजून घेत, अशाच प्रकारची यंत्रणा उभारण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. या महिन्याच्या अखेरीस औरंगाबादेतील संस्थादेखील उमरखेडला भेट देणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण करून खतरूपाने त्याचे सोने करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.
प्लास्टिकबंदीबाबत सकारात्मक पाऊल उचलून अंमलबजावणी करणाऱ्या उमरखेड नगर परिषदेकडे कचरा व्यवस्थापनाची कोणतीही योग्य यंत्रणा नाही. शहरालगतच २२ एकर जागेवर कचऱ्याचे ढीग लागले आहेत. अनेक ठिकाणी खुलेआम कचरा जाळला जातो. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही धोकादायक बाब असल्याचे ‘दैनिक दिव्य मराठी’ने, संबंधितांच्या लक्षात आणून दिले. त्यासाठी बैठक घेतली. सर्वांनी यावर उपाय करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यानुसार औरंगाबादेतील वेगवेगळ्या प्रकल्पांना भेट देण्याचे ठरले. त्यानुसार शनिवार, १२ डिसेंबरला पथकाने वेगवेगळ्या प्रकल्पांसह तज्ज्ञांना भेटून, बारकावे जाणून घेतले. या वेळी मुख्याधिकारी प्रवीण मानकर, नंदकिशोर अग्रवाल, इनायतुल्ला जनाब यांच्यासह भारत खंदारे, बालाजी देशमुख, गजानन आलट, बालैया दुर्गमवार, संजय कटुके, तानाजी चव्हाण आणि रूपेश कलंत्री उपस्थित होते.

निर्धार पक्का
^आमच्याकडे मनुष्यबळ भरपूर आहे. निधीचीही कमतरता नाही. अनुभव आणि माहिती नव्हती. ती औरंगाबादमधून परिपूर्ण मिळाली आहे. उमरखेडकर जागरूक आहेत. त्यामुळे त्यांच्या सहभागातून शहर कचरामुक्त करणारच. असा आमचा निर्धार झाला आहे. नंदकिशोर अग्रवाल, इनायततुल्लाखान
कचरामुक्त करणार

^दैनिकदिव्यमराठीच्या रूपेश कलंत्री यांच्या पुढाकारामुळे सुरुवात झाली. सर्व पदाधिकाऱ्यांचा निर्धार औरंगाबाद ‘सिडको’च्या घनचकरा व्यवस्थापनाच्या धर्तीवर कचरामुक्त शहर करणार, हे निश्चित. त्यासाठी शहरवासीयांनी नगर पालिकेला शहरवासी तसेच पदाधिकारी यांची मदत लागणार आहे. प्रवीण मानकर, मुख्याधिकारी,नगर परिषद

उमरखेडकरांचे अभिनंदन
^३००किलोमीटरचाप्रवास करून हे लोक आले आणि दिवसभर गांभीर्याने बारीक-सारीक गोष्टी पाहिल्या. त्यांची इच्छाशक्ती पाहता येत्या काही महिन्यांत गावाचे चित्र बदललेले असेल. मात्र त्यासाठी नगर पालिकेसोबतच शहरवासीयांनी आपले कर्तव्य पार पाडण्याची आजतरी गरज वाटत आहे. नताशा झरीन, सीआरटी अध्यक्ष

वैद्यकीय कचरा
तुटलेल्याकाचा, सॅनिटरी नॅपकीन, बॅन्डेजेस्, सिरींजेस, डायपर्स, खिळे, ट्यूब, ब्लेड, या वस्तू मोठ्या पेपरमध्ये गुंडाळून त्याचे तोंड घट्ट बांधून द्यावे जेणेकरून कर्मचाऱ्यांना इन्फेक्शन वा दुखापत होणार नाही. हा वैद्यकीय कचरा आहे.

सुका कचरा
प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, गोळ्यांचे पाकीट, स्नॅक्स, चॉकलेट, गोळ्या बिस्किट्स दुधाच्या पिशव्या, कागद, काच, केस, टिशू पेपर आदी प्रकारचा कचरा हा सुका कचरा या सदरात मोडते.

ओला कचरा
बागेतील पालापाचोळा, अंड्याची साल, हाड, स्वयंपाक घरातील खरकटे, फळांच्या साली, टरफले, भाज्यांचे देठ, उष्टे अन्न हा ओला कचरा असून तो वेगळा ठेवण्याची गरज असते.
औरंगाबादच्या अपना नगर भागातील महिलांनी एकत्र येऊन कशाप्रकारे कचऱ्यापासून खत निर्मितीचा उपक्रम यशस्वी केला, त्याची माहिती घेताना सिडकोचे अधिकारी, उमरखेड येथील पथक. आैरंगाबादेत सिडको परिसरातील उद्यानांमध्ये कंपाेस्ट खताचा कसा उपयोग करण्यात आला,त्याची उमरखेड येतील पथकाला माहिती देताना सिडकोचे अधिकारी. कचऱ्यापासून खत निर्मिती कशा प्रकारे केली जाते, याविषयीची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी उमरखेड येथील पथकाला दिली.
मिळून घडवू बदल

असे चालते ‘सिडको’त काम
१५ जून २०१५ पासून सिडकोतील वाळूज महानगरात कचरा व्यवस्थापनाला सुरुवात झाली. ४० कर्मचाऱ्यांच्या बळावर जवळपास चारशे हेक्टर परिसर असलेल्या वाळूज महानगरात काम सुरू आहे. ३० हजार लोकसंख्या असलेल्या या भागात दररोज टन कचरा उचलला जातो. प्रत्येक घरातून ओला, सुका आणि जैविक कचरा वेगवेगळा घेतला जातो. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करून ते खत सिडको हद्दीतील हरितपट्टे उद्यान, दुभाजकातील झाडांना वापरले जात आहे. सुका कचरा विक्रीतून रोजगार मिळावा, यासाठी उपलब्ध करून दिला जातो. सीआरटी या संस्थेच्या मार्गदर्शनात हे काम हाताळले जात आहे. सुरुवातीला जनजागृतीसाठी कोपरा बैठका, कार्यालयात बैठका, पत्रकांचे वितरण करून ओला आणि सुका कचऱ्याबाबत जनजागृती केली. आता या भागातील नागरिक कचरा वेगळा करूनच देतात.

चमूने येथे केली पाहणी
पथकाने सिडकोच्या खत प्रकल्पाबरोबरच, सिडकोतील बागा, जे. के. अॅन्सल उद्योगातील कचरा व्यवस्थापन, अपनानगर येथे महिलांनी पुढाकार घेऊन यशस्वी केलेले कम्युनिटी कंपोस्टिंगचा अभ्यास केला. ‘सिडको’चे सहायक वसाहत अधिकारी शशिकांत वाईकर, स्वच्छता निरीक्षक सुधीर खैरे, ‘सीआरटी’च्या नताशा जरीन, गौरी मिराशी, सुरेश घोरपडे, कारभारी घुगे, वाल्मीक सोनवणे, कडुबा गीते, जमुना राजेश मानधनी यांनी घनकचऱ्याविषयी माहिती दिली. याशिवाय तज्ज्ञ बी. डी. भूमकर यांनी घराघरात सोप्या पद्धतीने खत निर्मिती करण्याचे मार्गदर्शन केले.
बातम्या आणखी आहेत...