आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वापर प्रमाणपत्राशिवाय नाही वीज आणि पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ऑक्युपन्सी सर्टिफिकेट शिवाय (ओसी) वीज पाण्याची सोय उपलब्ध करून देता कामा नये, असे आदेश मनपा आयुक्तांनी बजावले आहे. या दोन्ही बाबी मिळवून घेण्यासाठी मनपातर्फे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवावे लागते. त्यामुळे तसे पत्र मागण्यापूर्वी आता प्रत्येकालाच मनपाची ओसीही (वापर प्रमाणपत्र) प्राप्त करून घ्यावी लागणार आहे.

नगररचना विभागाशी (एडीटीपी) संबंधित डीसीआर प्रणालीच्या प्रमुखांना उद्देशून त्यांनी हे आदेश बजावले आहेत. संबंधित विभागाने तशी माहिती सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जाहिरात करावी नागरिकांना असे प्रमाणपत्र मिळवून घेण्यास बाध्य करावे, असे आयुक्तांचे निर्देश आहेत.
अमरावती बडनेरा मिळून मनपा क्षेत्रात तब्बल दीड लाख मालमत्ता आहेत. यापैकी केवळ ८० ते ८५ नागरिकांनीच आतापर्यंत ओसी घेतले आहे. तरीही सर्वांना वीज पाण्याचे कनेक्शन मिळाले. ही बाब धक्कादायक असल्याने यापुढे तयार होणाऱ्या कोणत्याही नव्या इमारतीला ओसीशिवाय वीज पाणी पुरवठा होऊ नये, याची काळजी मनपा प्रशासन घेणार आहे. यासाठी संबंधित विभागांचे सहकार्य मिळावे म्हणून त्या-त्या विभागाच्या प्रमुखांनीही मनपाने पत्र पाठविले असून मनपाच्या ओसीशिवाय असे कनेक्शन देऊ नये, असे म्हटले आहे.

शहरामध्ये घर, कार्यालय, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉज किंवा इतर कोणतीही इमारत बांधताना मनपाची परवानगी घेतली जाते. मात्र बहुतेक प्रकरणांमध्ये परवानगीचे उल्लंघन करुन परवानगीपेक्षा जादा बांधकाम केले जाते. त्यामुळे बहुतेक नागरिक बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घ्यावयाचे आॅक्युपन्सी सर्टिफिकेटच (ओसी) घेतच नाहीत. त्यामुळेच शहरातील दीड लाख इमारतींपैकी केवळ ८० ते ८५ नागरिकांनीच हे प्रमाणपत्र घेतल्याची नोंद मनपा दप्तरी दिसून येते.
दरम्यान मनपाच्या आदेशानंतर आता नागरिकांनी असे प्रमाणपत्र मिळवायचे ठरवले तर त्यांना त्यांच्या इमारतींच्या बांधकामाचे मूळ नकाशे आणि बांधकाम या दोन्ही बाबींची पडताळणी मनपाकडून करुन घ्यावी लागेल. असे करताना जादा बांधकाम उघड झाले तर त्याबाबतचा दंडही त्यांना भरावा लागणार आहे. त्यामुळे ते अशी जोखीम पत्करतात की नाही, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.

पुढे काय होणार ?
वीजकिंवा पाणी पुरवठा घेण्यासाठी सध्याही मनपाच्या एनओसीची मागणी केली जाते. आता त्यासोबतच ‘ओसी’चीही मागणी केली जाईल किंवा मनपातर्फे एनओसी देतानाच संबंधित इमारतीच्या ओसीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत नेमके काय धोरण स्वीकारले जाते, हे मात्र कळू शकले नाही.