आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"पाणी रे पाणी' म्हणण्याची बडनेरावासीयांवर येणार वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रशासनाने प्रस्तावित केलेली नगरोत्थान योजना बारगळल्याने बडनेरात पाणी रे पाणी... अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे अाहेत. बडनेरा जुनी वस्ती भागातील पाण्याच्या टाकीच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. एक वर्षांपूर्वी पाण्याची टाकी पाडण्यात आली असली तरी नवीन उंच टाकी बांधण्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात बडनेरावासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
जुनी वस्ती नवीन वस्ती भागात असलेल्या बडनेरा शहराला सद्य:स्थितीत एकाच पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केल्या जातो. शहरातील लोकसंख्येचा विचार करता दोन्ही भागासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी असणे गरजेचे आहे. पूर्वी संपूर्ण शहराला जुनी वस्ती येथील उंच टाकीतून पाणीपुरवठा केल्या जात होता. ते वर्षांपूर्वी नवीन वस्ती भागातील पवननगरात पाण्याची नवीन टाकी बांधण्यात आली. दोन उंच टाकी असल्याने शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत होता. दरम्यान, जुनी वस्ती अलमास गेटजवळील पाण्याची टाकी अंदाजे ५० वर्ष जुनी असल्याने शिकस्त झाली होती. २०१४ मध्ये शिकस्त झालेली पाण्याची टाकी पाडण्यात आली.नवीन उंच टाकीला मंजुरी मिळाली नसताना अलमास गेट येथील शिकस्त टाकी पाडण्यात आली. यामुळे जुनी वस्ती परिसराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नवी वस्ती भागात असलेल्या टाकीवर आली आहे. शहराचा विस्तार झपाट्याने झाला असून, लोकसंख्येतदेखील वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेता पवननगरातील पाण्याच्या टाकीवर पाणीपुरवठ्याचा भार वाढत आहे. सकाळी जुनी वस्ती आणि रात्रीला नवीन वस्ती परिसरात पाणीपुरवठा केल्या जातो. शहरातील एकमेव टाकीतून दोन वेळेस पाणीपुरवठा होत असल्याने पाइपलाइनदेखील सतत सुरू राहते. जलशुद्धीकरण केंद्रातून महादेव खोरी, बडनेरा, गोपालनगर, सातुर्णा आदी परिसरातील टाकीला एकाच पाइपलाइनमधून पाणीपुरवठा होतो. सतत पाणीपुरवठा सुरू राहत असल्याने पाइपलाइनदेखील लवकर नादुरुस्त होण्याची स्थिती आहे. पाण्याची उंच टाकी नाही, बांधकाम करण्यास मंजुरी कधी मिळेल याचा पत्ता नाही, त्यामुळे आगामी दिवसांसह उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ बडनेरातील नागरिकांवर येणार आहे.

श्रेयाच्या लढाईत हाल
बडनेरा शहरात होत असलेल्या मात्र दिसत नसलेल्या विकासकामांच्या श्रेयाच्या लढाईत नागरिकांचे हाल होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आजी आणि माजी आमदारांमध्ये असाच कलगीतुरा रंगला होता. नगरोत्थान योजनेला आपल्यामुळेच कशी मंजुरी मिळाली, असे सांगण्यासदेखील ते विसरत नव्हते. मात्र, श्रेयातील लढाईच्या वादात बडनेरावासीयांचे मात्र हाल होत आहे.

पुढे काय?
नगरोत्थान योजना बारगळली असून, अमृत योजनेला अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे नजीकच्या काळात पाण्याच्या टाकीची निर्मिती होणे शक्य नाही. परिणामस्वरूप उन्हाळ्यासह आगामी दिवसांमध्ये पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ बडनेरातील नागरिकांवर येणार आहे.

असा होता प्रस्ताव
किंमतींची आकडेवारी कोटी रुपयांमध्ये
योजना तालुका यंत्रणा किंमत
Àअमरावतीअमरावतीमजीप्रा ४४.४४
Àचिखलदराचिखलदरामजीप्रा ३.२१
Àअंजनगावअंजनगावमजीप्रा २.९९
स्वतंत्र प्रादेशिक योजना योजना
जि.प. ०० ०१
मजीप्रा ०० ०३
ग्रा.पं. ११३१ ०३

अमरावतीकरां नाही बसणार चटके
बडनेरा शहरामधील पाणीपुरवठ्याची समस्या निकाली निघावी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगरोत्थान योजनेतून शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये याबाबत चर्चादेखील करण्यात आली होती. त्यानुसार शहरासाठी ४४ कोटी ४४ लाख रुपयांची नगरोत्थान योजना मंजूर झाल्याचा भासदेखील लोकप्रतिनिधींनी करून दिला होता. मात्र, नगरोत्थान योजना बारगळली. परिणामी बडनेरा शहराला पाणीटंचाईचे चटके भविष्यात बसणार आहेत. एवढेच नव्हे तर अमरावतीकरांनादेखील पाणीटंचाईचा सामना येत्या उन्हाळ्यामध्ये करावा लागणार आहे, असे चित्र दिसते.

पाण्याची समस्या निर्माण होईल
^जुनी वस्ती भागात नवीन टाकीचे बांधकाम तातडीने करणे गरजेचे आहे. आताच पाणीटंचाईला सामाेरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दुरुस्ती कार्याच्या वेळेस नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागला. ८० ते ९० टक्के पाणी बिलाचादेखील भरणा केल्या जात आहे. '' अब्दुल रईस

अमृत योजनेतून प्रस्ताव
^जुनी वस्तीमधील उंच टाकीच्या निर्मितीसाठी नव्याने अमृत योजनेतून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यापूर्वी ४४.४४ कोटी रुपयांमधून टाकीचे बांधकाम प्रस्तावित होते, मात्र नगरोत्थान योजनेला शासनाची मंजुरी मिळाली नाही. २० लाख लीटर क्षमतेच्या तसेच एक लाख लोकसंख्येच्या गावाकरिता पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजनेतून निधी प्राप्त होतो. या योजनेतून निधी मिळावा म्हणून प्रयत्न केल्या जात आहे.'' प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
पाण्याची जुनी उंच टाकी पाडण्यात आलेली जागा.