आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: शहरात दारू विक्री बंद; ऐतिहासिक निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरात दारु बंदी विरोधात जनसामान्यांनी उभारलेल्या लढ्याला गुरूवारी (दि. २७) यश आले असून नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी शहरातील (पोलिस आयुक्तालय हद्दीतील) सर्व देशी दारु वाईन शॉपींचे परवाने निलंबीत करून त्या दुकानांना सील ठोकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या दुकानांना नागरीवस्ती बाहेर जागा शोधून दुकाने थाटण्याबाबतही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने सायंकाळपासून शहरातील या दुकानांना सील लावण्याची कार्यवाही सुरू केली होती.
 
राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्या आतमध्ये येणाऱ्या सर्व दारु दुकानांना दारु विक्री परवाना देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले होते. त्यामुळे एक एप्रिलपासून पाचशे मीटरच्या आत येणारे सर्व दारु दुकान बंद झाले आहेत. त्यामुळे शहरातील नागरी वस्तीत सुरू असलेल्या दुकानांवर सकाळपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत मद्यपींची प्रंचड गर्दी होत होती. यातूनच भांडण, मारामारी, वाहतुकीला खोळंबा, स्थानिक नागरिकांना त्रास हे प्रकार वाढले होते. त्यामुळे शहरातील जनसामान्यांनी ही दुकाने हटवण्यासाठी लढा सुरू केला होता. या लढ्यात सर्वप्रथम रुक्मिणीनगर, विवेकानंद कॉलनीवासीयांनी सुरूवात केली. त्यापाठोपाठ केशव कॉलनी, राजापेठ परिसरातील नंदा मार्केट भागात राहणाऱ्या नागरिकांनीही लढा उभारला होता. 

जनसामान्यांचा विविध मार्गाने लढा सुरूच होता. दरदिवशी दुकानासमोर भजन, कीर्तन तसेच प्रशासनाला निवेदन देऊन दुकान बंद करण्याची एकमुखी मागणी सुरू होती. दरम्यान २५ एप्रिलला पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला होता. शहरातील नागरी वस्तीत असलेल्या दारु दुकानांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झालेल्या आहेत. या दुकानांसमोर पोलिस बंदोबस्त लावणे योग्य होणार नाही, त्यामुळे या दुकानांसदर्भात आपण निर्णय घ्यावा, असा अहवाल पोलिस आयुक्तांनी मंगळवारी (दि. २५) पाठवला होता. या अहवालावरूनच जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी रुजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच धाडसी निर्णय घेत शहरातील सर्व देशी दारु वाईन शॉपीचे परवाना निलंबीत करण्याचे आदेश दिले आहे. तसेच या परवानाधारकांनी दुकानांसाठी नागरी वस्तीच्या बाहेर, ज्या ठिकाणी दुकान सुरू केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा ठिकाणी दुकान स्थंलांतरीत करावे, अशी नोटीससुध्दा बजावली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुरूवारी सायंकाळपासूनच राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील देशी दारु तसेच वाईन शॉपींना सील लावण्याची कार्यवाही सुरू केली होती. या निर्णयामुळे जनसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

दरम्यान शहरातील विवेकानंद कॉलनीतील नागरिकांनी मागील पाच दिवसांपासून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू केली होती. यामध्ये सुंदरकांड, दुकानासमोर दुधाचे वाटप, निवेदन अशा आंदोलनाचा समावेश होता. तसेच गुरूवारी दुपारी विवेकानंद कॉलनी, रुक्मिणीनगरमधील शेकडो महिला पुरूषांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून दुकान बंद करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी केशव कॉलनी परिसरातील दुकान बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी चार दिवसांपासून वेगवेगळी आंदोलन केली होती. तसेच दुकानासमोर आंदोलन सुरू केले होते. ते सुध्दा गुरूवारीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. यावेळी रुक्मिणीनगर केशव कॉलनी परिसरातील नागरीकांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. आपल्या मागणीवर तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दुपारीच जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावेळी नगरसेविका जयश्री डहाके, संगीता पवार, अॅड. मेश्राम, अतुल गायगोले, अनिकेत देशमुख, अंकुश डहाके, राजेंद्र ठाकरे यांच्यासह शेकडो महिला पुरूषांची हजेरी होती. 

देशी दारुचे १४ वाईन शॉपीचे दुकान सील 
पोलिसआयुक्तालयाच्या हद्दीत ३१ मार्च २०१७ पर्यंत मद्यविक्रीचे एकूण १७७ ठिकाण होते. त्यामध्ये २६ वाईन शॉप, ९२ बार, देशी दारुचे दुकान ४४ आणि बिअर शॉपी १५ यांचा समावेश होता. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे २६ पैकी २३ वाईनशॉपी बंद, ९२ बारपैकी ७८ बंद, १५ बिअर शॉपीपैकी ११ बंद आणि४४ देशी दारु दुकानांपैकी ३० बंद झाले आहेत. त्यामुळे गुरूवारी सायंकाळपर्यंत शहरात वाईन शॉपी, १४ बार, बिअर शॉपी आणि १४ देशी दारुचे दुकान सुरू होते. गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झाल्यामुळे तीन वाईन शॉपी देशी दारुचे १४ दुकान सील करण्याची प्रक्रिया सुरू होती. याचवेळी १४ बार बिअर शॉपी शहरात सद्या सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे 

वाद निवळला 
दरम्यानबुधवारी सायंकाळी संगीता पवार कॅम्प परिसरातील केशव कॉलनीमधील नागरिक पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना भेटण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयात गेले होत्या. चर्चा सुरू असताना पोलिस आयुक्त आणि संगीता पवार यांच्यात शाब्दीक वाद झाला होता. या प्रकरणाची संगीता पवार यांनी पोलिस आयुक्तांविरुध्द फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान पोलिस आयुक्त यांच्या कक्षामध्ये कार्यरत पोलिस शिपायानेही संगीता पवार यांच्याविरुध्द फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र गुरूवारी (दि. २५) दुपारी १२ वाजता संगीता पवार केशव कॉलनीमधील काही नागरिक यांनी पोलिस आयुक्तांसोबत पुन्हा चर्चा केली. 

यावेळी पोलिस आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी झालेल्या प्रकारावर बोलताना सांगितले की, माझ्या बाेलण्यातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तसेच आम्ही या प्रकरणात नागरिकांच्या समस्या जाणून आहोत, त्यामुळे आम्ही तुमच्या (नागरिकांसोबत) सोबत असल्याचेही पोलिस आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर संगीता पवार यांनी म्हटले की, दारुबंदी ही आमची प्राथमिकता आहे. दारु बंदीसाठी आम्ही हे आंदोलन उभे केले आहे. त्यास सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. 

आयुक्तालयाच्या हद्दीतील दारु दुकाने सीलची कारवाई सुरू 
जिल्हाधिकाऱ्यांनीपोलिसआयुक्त हद्दीतील सर्व वाईन शॉप देशी दारु दुकान बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच गुरूवारी सांयकाळपासून आम्ही देशी दारु दुकान वाईन शॉपींना सील लावण्याचे काम सुरू केले आहेत. - प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अमरावती. 

सीपींच्या अहवालावरून आदेश 
पोलिस आयुक्तांनी पाठवलेल्या अहवालावरून कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसेच संबधित परवानाधारकाने नागरी वस्तीबाहेर ज्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशा ठिकाणी दुकान स्थलांतरीत करण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. 
- अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती. 
बातम्या आणखी आहेत...