आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी पुढे आलेल्या महिलेवर दारू विक्रेत्याचा हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्यासमक्ष झालेल्या बैठकीस उपस्थित महिला.)
अमरावती- शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रेवसा गावात एका अवैध दारू विक्रेत्याने दारूबंदीसाठी पुढे आलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. ५) घडली. या प्रकरणी रविवारी रात्री त्या दारू विक्रेत्याविरुद्ध पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी रेवसा येथे जाऊन ग्रामस्थांसोबत बैठक घेतली.
साहेबराव महादेवराव पिरासे (वय ३६ रा. रेवसा) असे गुन्हा दाखल झालेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. त्याने गावातील कमलाबाई वानखडे या महिलेवर हल्ला चढवला होता. या वेळी कमलाबाईंनीसुद्धा त्याचा प्रतिकार केला तसेच कमलाबाईच्या बचावासाठी गावातील काही मंडळी पुढे आली. त्यांनी पारिसेलासुद्धा चोप दिला. या हाणामारीत दारू विक्रेता पिरासेही जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
रेवसा गावात मागील काही दिवसांपासून पाच जण अवैध दारू विक्री करीत होते. गावातील दारू विक्री बंद व्हावी, यासाठी गावातील महिलांनी आठ दिवसांपूर्वीच आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना निवेदन दिले होते. त्या निवेदनानंतर गावातील पाचपैकी चार विक्रेत्यांनी दारू विक्री बंद केली होती. मात्र, साहेबराव पिरासेचा व्यवसाय सुरूच होता. रविवारी सकाळी याच कारणासाठी हा वाद झाला होता. प्रकरणी कमलाबाईंच्या तक्रारीवरून साहेबरावविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला तर साहेबराव पिरासेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोहरराव वानखडे, विश्वासराव वानखडे यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणानंतर पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी रविवारी सायंकाळी रेवसा येथे जाऊन ग्रामस्थांसोबत चर्चा केली. रेवसा येथे दारूमुळे भीषण अवस्था झाली असल्याचे वास्तव गावकऱ्यांनी त्यांच्यापुढे मांडले.

आता दारू पिणाऱ्यांविरुद्ध कारवाई
साहेबरावपारिसे नामक दारू विक्रेत्याने महिलेवर हल्ला चढवला. त्या वेळी प्रतिकार करण्यासाठी त्या दारू विक्रेत्यालाही चोप दिला आहे. दोघांच्याही तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहे. रेवसा येथे ग्रामस्थांसोबत चर्चा केल्यानंतर गावातील भीषण वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे आम्ही आता पुढील काळात या गावात दारू पिऊन आढळणाऱ्यांविरुद्धसुद्धा कारवाई करणार आहे. सोमनाथघार्गे, पोलिस उपायुक्त, अमरावती