आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुची अवदसा हटवा; गरिबांचे संसार वाचवामंगरुळ दस्तच्या महिलांची जिल्हाकचेरीत धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संपूर्ण जिल्ह्यातच दारुबंदीसाठी नारीशक्ती पुढे सरसावली असून मंगळवारी (दि.२ मे) दारुची अवदसा हटवण्याच्या मागणीसाठी मंगरूळ दस्तगीर येथील महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तळ ठोकून बसल्या. अखेर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीची दखल घ्यावीच लागली. मंगळूर दस्तगीर येथील देशी दारूचे दुकान परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले असून ते हटवून गावाबाहेर नेण्यात यावी, अशा मागणीचे िनवेदन शेकडोच्या संख्येत असलेल्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

मंगरूळ दस्तगीर येथील वार्ड क्र. एकमध्ये दिघडे यांचे देशी दारुचे दुकान असून तेथून महिलांना पाणी भरण्यासाठी सतत ये-जा करावी लागते. लगतच चौक असल्यामुळे बस खासगी कंपनीची वाहने तेथे थांबतात. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, लहान मुलेही याच मार्गावरून जाणे-येणे करीत असतात. दुकानापासून सुमारे १०० मी. वर स्त्री रुग्णालय आहे. त्या लगतच आठवडी बाजार भरतो. देशी दारूच्या दुकानामागे मंगल कार्यालय असून या दुकानामुळे समाजावर वाईट परिणाम होत आहेत. 

देशी दारूचे दुकान सकाळी ते रात्री ११ पर्यंत सुरू असते. बंद झाल्यानंतरही अवैध मार्गाने देशी दारुचा पुरवठा होत राहतो. गावातील मुख्य रस्त्यावर दुकान असल्यामुळे मुले, रुग्ण, महिला, विद्यार्थी असा सर्वांनाच याचा त्रास होत असतो. या मार्गावरून जाणाऱ्या महिलांना मद्यपी, गुंड दारू पिऊन अश्लिल भाषेत टोमणे तर मारतच असतात शिविगाळही करतात. त्यामुळे स्त्रियांसह विद्यार्थिनी नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. याप्रसंगी मंगळूर दस्तगीर येथील वार्ड क्र. एकचे नागरिक, बाबा ठाकूर तसेच माधुरी किनकार, सुमित्रा बेटे, अर्चना किनेकार, ज्योती भोयर, पुष्पा हिवरकर, छबू निमरड, सारिका भोयर, वनिता ठाकरे, नत्थू मोलोडे, सविता रोहनकार, लता वैद्य, रेखा तिवाडे, प्रीती भोयर, शांता जयस्वाल आदी हजर होत्या.
 
आत्मदहनाचा इशारा 
देशी दारूचे दुकान गावात असल्याने तरुणांना दारूचे व्यसन जडले आहे. तसेच किशोरांनाही व्यसन लागण्याचा धोका आहे. या सर्व प्रकाराला आळा बसावा म्हणून देशी दारूचे गावाबाहेर नेण्यात यावे. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करून आत्मदहन करू. यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...