आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला प्रसाधनगृहांच्या निविदेला पुन्हा मुदतवाढ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महिला प्रसाधनगृहांचा पथदर्शी प्रकल्प म्हणून महापालिकेच्या आवारात उभारल्या जाणाऱ्या प्रसाधनगृहाच्या निविदेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. उद्या, सोमवारी याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
चौदाव्या वित्त आयोगातील १७ लाख रुपये खर्चून हे बांधकाम केले जाणार आहे. त्यासाठी गेल्या पंधरवड्यातच निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार तयार झालेले वेळापत्रक संपुष्टात आल्यामुळे एकदा मुदतवाढही देण्यात आली. परंतु, तरीही निविदा प्राप्त झाल्यामुळे उद्या, सोमवारी दुसऱ्यांदा निविदा प्रकाशित केली जाणार आहे. शहरातील प्रमुख बाजारओळींमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे त्यांची कुचंबणा होते. हा विषय ‘दिव्य मराठी’ने लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर मनपा ‘मिळून साऱ्या जणी’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन समाधान शोधण्याचे कार्य सुरू केले आहे. मनपा प्रशासनाच्या मते शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छतागृह उभारले जाणे आवश्यक आहे. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपूर्वी वाॅर्डनिहाय जागा शोधण्याची मोहीम राबवण्यात आली. अद्याप त्या योजनेला मूर्तरूप प्राप्त झाले नाही. परंतु, या मोहिमेचा पथदर्शी प्रकल्प म्हणून मनपा इमारतीतील झोन दोनचे कार्यालय असलेल्या इमारतीखालील जागेत दोन स्वच्छतागृहे तयार केली जाणार आहेत.

‘जी प्लस वन’ अशी त्या इमारतीची रचना असून, सोळा सीटसची सोय असलेली ही इमारत लवकरच तयार व्हावी, यासाठी मनपा प्रशासनाचा बांधकाम विभाग आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहे. दरम्यान, प्रभागनिहाय स्वच्छतागृहांसाठी निवडलेल्या जागांचा संयुक्त दौरा करून तोही मुद्दा लवकरच निकाली काढला जाणार असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे.

जुन्या फायबर टॉयलेटमुळे घोळ
हा प्रश्न सोडवण्यासाठी मनपातर्फे फायबर टॉयलेट उभे करण्यात आले होते. परंतु, काही काळानंतर अख्खे टॉयलेटच गायब असल्याचे दिसून आले. शिवाय जे उभारण्यात आले होते, ते सदोष असल्यामुळे त्याचा वापरही केला गेला नाही. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी स्वच्छतागृहांची गरज निर्माण झाली आहे.

प्रभागनिहाय सर्वेक्षणासाठीही पुढाकार
^वाॅर्डनिहाय प्रसाधनगृहांची फाइल आरोग्य विभागाकडून माझ्या कार्यालयात (शहर अभियंता) पोहोचली अाहे. दरम्यान, आरोग्य विभागाला सोबत घेऊन प्रभागनिहाय सर्वेक्षण त्यानंतर त्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. जीवन सदार, शहर अभियंता, मनपा, अमरावती.