अमरावती - पश्चिम विदर्भातील अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या ११,४३० जागांसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. विभागात ११ हजार जागा असताना आतापर्यंत केवळ हजार ९६२ विद्यार्थ्यांकडून नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणीचे केवळ दोनच दिवस शिल्लक असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांची चिंता वाढली आहे.
अभियांत्रिकी तसेच बीटेक प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया गुरुवार, जूनपासून सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एमएचसीईटी दिल्यानंतर प्रथम नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नोंदणी प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जूनपासून आरंभ करण्यात आली आहे. सोमवार, १३ जूनपर्यंत केवळ हजार विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी बीटेक अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना आणखी दोन दिवस म्हणजेच १६ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. अत्यल्प नोंदणी करण्यात आल्याने अमरावती विभागातील अभियांत्रिकीच्या जागा शिल्लक तर राहणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलकडून राबवल्या जात असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये या वर्षी प्रथमच पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वसाधारण गुणवत्ता, अल्पसंख्याक तसेच व्यवस्थापन कोटा असो, सर्वांसाठी पात्रता परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांस प्रवेश दिला जाणार आहे.
पात्रता परीक्षेचा निकाल जून रोजी घोषित करण्यात आला, त्यानंतर अभियांत्रिकी बीटेक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रियादेखील आरंभ करण्यात आली. व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या अभियांत्रिकी बीटेक प्रथम वर्षाला प्रवेश घेणे सोपे व्हावे म्हणून आयआयटीप्रमाणे प्रथमच ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे.
एक वेळ नोंदणी करण्यात आल्यानंतर प्रत्येक कॅप राउंडला विद्यार्थ्यांना नव्याने ऑप्शनदेखील देण्याची गरज भासणार नाही. नोंदणी करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना एकदाच महाविद्यालय तसेच अभ्यासक्रमांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. पहिल्या राउंडमध्ये एखाद्या अभ्यासक्रमास क्रमांक लागल्यास तसेच विद्यार्थ्याला प्रवेश नको असल्यास तसा बदल करण्याची सुविधादेखील या प्रक्रियेमध्ये देण्यात आली आहे. शिवाय हा बदल केल्यानंतर नव्याने पसंतीक्रमाची गरजदेखील नाही. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने विभागात २५ महाविद्यालयांमध्ये सुविधा केंद्रांची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया तब्बल दोन महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे.
महाविद्यालयांची संख्या
अमरावती : ७, शेगाव : १, बडनेरा : २, अकोला : ३, पुसद : १, चिखली : १, यवतमाळ : ३, बुलडाणा : २, धामणगाव रेल्वे : १, येलगाव : १, वाशीम : २, शिरजगाव निळे : १
नोंदणीचे आवाहन
अभियांत्रिकी बीटेक प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेकरिता सर्वप्रथम नोंदणी गरजेची आहे. नोंदणी करण्याकरिता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहसंचालक डॉ. डी. एन. शिंगाडे यांनी केले आहे.