आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील अकरावीचे हजार ९५० जागांचे प्रवेश निश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या हजार ९५० जागांचे प्रवेश निश्चित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. बी. लोहिया यांनी दिली. प्रवेश निश्चित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी साेमवार ११ जुलै रोजी पाच महाविद्यालयांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांना बुधवार १३ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार आहे.
शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग अकरावी कला, वाणिज्य विज्ञान शाखेचे प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीद्वारे होत आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया १६ जूनपासून आरंभ करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात कॅम्पस तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे एकूण १५०० प्रवेश निश्चित करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत एकूण १३२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. दुसऱ्या टप्पात विशेष राखीव संवर्ग एसआरसी अंतर्गत (आजी-माजी सैनिक पाल्य, अपंग पाल्य, खेळाडू, कला संवर्ग, बदली कर्मचारी पाल्य) एकूण १७७ प्रवेश करण्यात आले. प्रवेशाचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्पात उर्वरित विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सोमवार ११ जुलैला सहा महाविद्यालयांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्वसाधारण विद्यार्थ्यांकडून ८,०५६ प्रवेश अर्ज समितीला प्राप्त झाले. त्यातील पूर्ण प्रवेशित किंवा डबल अर्ज वगळून ७,७१६ अर्ज प्रवेशाकरीता विचारात घेण्यात आले. यापैकी ५,९५० विद्यार्थ्यांचे त्यांच्या पसंती क्रमानूसार प्रवेश निश्चित करण्यात आले. १,७६६ विद्यार्थ्यांचे पसंतीक्रम संपल्याने त्यांना प्रवेश देता आला नाही, त्यामुळे यादीत नावे नसलेल्या १७६६ विद्यार्थ्यांची तसेच समितीकडे अर्ज सादर करु शकलेल्या विद्यार्थ्यांकरीता १९ २० जुलै रोजी अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्जाची विक्री मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, बियाणी महाविद्यालय, खोडके कॉम्प्युटर रेल्वे स्टेशन, नॅसकॅम कॉम्प्युटर शेगाव नाका, प्रगती कॉम्प्युटर सेंटर रुख्मिणीनगर येथे पुन्हा मूळ टी.सी. पाहून अर्ज घेतले जाणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी २२ जुलैला मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, बियाणी महाविद्यालयात प्रसिद्ध होणार आहे.

यावेळी प्राचार्य डॉ. एस.बी. लोहिया, सचिव प्रा. अरविंद मंगळे, उपाध्यक्ष प्राचार्य ए. के. चितालीया, प्राचार्य डॉ. व्ही. जी. ठाकरे, प्राचार्य डॉ. एफ.सी. रघुवंशी, प्राचार्य डॉ. व्ही. एल. भांगडीया, प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, प्राचार्य डॉ. आर. डी. देशमुख, प्रा. पी. एम. मळसणे, प्राचार्य पी. एम. दिवे, प्राचार्य माधवी मंगरूळकर, प्रा. फैजान इकबाल शिक्षण विभागाचे मुकुंद घडेकर उपस्थित होते.

कला शाखेस प्राधान्य
यादीतीलप्रथम क्रमांकावरील गीता सुराटणे या विद्यार्थिनीने कला शाखेस प्रवेशासाठी प्राधान्य दिले अाहे. गीता हिला गुणवत्तेनुसार श्री शिवाजी कला महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. तिला १०० टक्के गुण मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...