आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘महर्षी’चे 12 आदिवासी विद्यार्थी तापीमुळे इर्विनमध्ये, मृत्यूचे प्रकरण चिघळल्याने सावध भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नवसारी परिसरातील महर्षी पब्लिक स्कुलमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच याच ठिकाणच्या आणखी १२ आदिवासी विद्यार्थ्यांना तापाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) दाखल करण्यात आले होते. दरम्यान तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने प्रकरण चिघळले होते. दरम्यान १२ विद्यार्थ्यापैकी दहा विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अजूनही दोन विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. 
 
सुवर्णा नंदाराम बेठेकर (८),ध्रुव भानू कास्देकर (८), राहुल हिरालाल बेठेकर (१२), कांचन बिनलाल कास्देकर (८), पवन नंदू कास्देकर (१०), प्रदीप कैलाश आत्राम (८), अरविंद हरिराम जांभेकर (८), रोशनी रामू दहीकर (१२), अर्जुन बाळू ठाकरे (८), भाग्यश्री संतू जावरकर (१०) यासह अन्य एक अशा १२ विद्यार्थ्यांना मंगळवार, ऑक्टोबरला उशिरा रात्री वसतिगृहातून उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल करण्यात आले होते. हे बाराही विद्यार्थी तापाने फणफणत होते. त्यांना ‘व्हायरल फीव्हर’ असल्याचे इर्विनच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. ऑक्टोबरलाच पहाटे महर्षी इंग्लिश स्कुलमध्ये शिकणारा याच ठिकाणी असलेल्या वसतिगृहात राहणारा रोषण कैलास सावलकर या आठ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. शाळा प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यामुळे रोषणचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी पालकांनी करून पोलिसात तक्रार दिली होती. 

रोषणची प्रकृती गंभीर असल्यावरही त्याला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नाही असाही आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप पुढे आले नाही तोच याच शाळेचे त्याच वसतिगृहात राहणारे तब्बल १२ आदिवासी विद्यार्थी एकाचवेळी तापाने फणफणले होते. झालेली घटना ताजीच असल्यामुळे महर्षी शाळा प्रशासनाने या १२ विद्यार्थ्यांना मंगळवारी उशिरा रात्रीच इर्विनमध्ये दाखल करून आपली जबाबदारी पार पाडली. दरम्यान, उपचार घेऊन बारापैकी दहा विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून गुरुवार, ऑक्टोबरला सुटी देण्यात आली आहे. उर्वरित दोन विद्यार्थी सुवर्णा बेठेकर ध्रुव कास्देकर यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. या बाराही विद्यार्थ्यांवर इर्विनमधील वॉर्ड क्रमांक मध्ये उपचार करण्यात आले.  
 
बालरोग तज्ज्ञांनी केलेत उपचार 
१२ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले होते. या विद्यार्थ्यावर बालरोग तज्ज्ञांनी उपचार केले असून, दहा जणांना सुटी देण्यात आली आहे. सद्या दोघांवर उपचार सुरू आहेत. 
- डाॅ.श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक. 
 
‘व्हायरल’ची साथ सुरू आहे 
आमच्या शाळेच्या १२ विद्यार्थ्यांना ताप आल्यामुळे आम्ही तातडीने इर्विनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती ठिक असून दहा जणांना सुटी झाली आहे. सद्या ‘व्हायरल फीव्हर’ची साथच सुरू आहे. त्यामुळे दक्षता म्हणून विद्यार्थ्यांना आम्ही त्वरित रुग्णालयात दाखल केले, असे ‘महर्षी पब्लिक स्कुल’चे प्रशांत राठी यांनी सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...