आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागरी जलतरणात १३ वर्षीय जयंतचा विक्रम; सात दिवस, १७ तास २१ मिनिटे, ६७.३१ किमी. अंतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मूळ अमरावतीकर अन् सध्या नागपूरच्या सोमलवार हायस्कूलचा विद्यार्थी असलेला १३ वर्षीय जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळेने मुंबई येथील अरबी समुद्रात २५ ते ३० डिसेंबर २०१५ या सहा दिवसांच्या कालावधीत एकूण १७ तास २१ मिनिटे पोहून ६७.३१ किमी. अंतर पूर्ण करून सागरी जलतरणात नवा राष्ट्रीय विक्रम स्थापित केला.

या अभियानादरम्यान मुंबईचे तापमान घटल्यामुळे अरबी समुद्रात थंड वारे जोराने वाहत होते. सोबतच लाटाही उंच उफाळत होत्या. तरीही डगमगता जयंतने लाटांना फ्रीस्टाइल जलतरणाद्वारे कापत लक्ष्याकडे वाटचाल सुरू ठेवली.वांद्रे सेलिंग ते राजभवनदरम्यान डाॅल्फीन मासे सोबत पोहून जयंतला प्रोत्साहन देत होते.

जयंतने अभियान पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेच्या ओपन वाॅटर स्वीमिंग कमिटीचे प्रमुख प्रभाकर घरत यांनी त्याला चषक प्रदान करून गौरवले. याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक जाधव, पोलिस उपनिरीक्षक दस्तुरे प्रामुख्याने उपस्थित होते. आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडेनेही जयंतचे अभिनंदन केले.

नागपूर पोलिस विभागाचा अव्वल जलतरणपटू सुखदेव धुर्वे, पं. बच्छराज हायस्कूलचा पुष्पक लांडे, स्कूल आॅफ स्काॅलर्सचा अभिषेक लाेहकरे, सेन्ट जाॅर्जचा मोहंमद उझेर, अमोल वाळसे, सेन्ट झेव्हियर्सचा काव्य चार्लेवार, पेस स्वीमर म्हणून या अभियानात सहभागी झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने दोन मोटार बोट जयंतसोबत होत्या. त्यात जयंतचे वडील मार्गदर्शक जयप्रकाश दुबळे, आई अर्चना दुबळे, आजी मालती आजोबा मधुकर दुबळे, सुभाष लांडे, उत्तम लोहकरे, अॅड. ईश्वर चार्लेवार प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.