आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या 19 ग्राहकांना रक्कम केली परत, 23 ग्राहकांना अजूनही प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरजगाव कसबा - येथील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ग्राहकांच्या खात्यातून विड्रॉल स्लिपद्वारे परस्पर स्वाक्षरी करून रक्कम उडवल्याचे प्रकरण सर्वप्रथम २५ ऑक्टोबरला ‘दै. दिव्य मराठी’ने उजेडात आणले होते. त्यानंतर अशी अनेक प्रकरणे पुढे आली. आतापर्यंत जवळपास ४२ ग्राहकांचे २१ लाख रुपये परस्पर गेल्याच्या तक्रार बँकेकडे प्राप्त झाल्या आहेत. या ग्राहकांची रक्कम परत करण्याची प्रक्रिया बँक प्रशासनाने सुरू केली असून, मागील तीन दिवसांत १९ ग्राहकांचे लाख ७२ हजार रुपये परत केले आहे. तसेच उर्वरित ग्राहकांनाही रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

 

बँकेत शिरजगाव येथील शेतकरी, शेतमजूर ग्राहकांसोबतच परिसरातील गावांमधील अनेक ग्राहकांचे खाते आहे. बँकेत रक्कम सुरक्षित असल्याच्या गैरसमजात असलेल्या ग्राहकांना त्यावेळी धक्का बसला ज्यावेळी लाखो रुपये त्यांच्या खात्यातून तेही विड्रॉल स्लिपद्वारे परस्परच काढल्याचे समोर आले. दरम्यान ‘दै. दिव्य मराठी’ने प्रकरण उजेडात आणताच बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी शिरजगावात दाखल झाले. तसेच बँकेच्या इतर ग्राहकांनी स्वत:चे खाते तपासण्यासाठी बँकेत गर्दी केली होती. त्यानंतर दरदिवशी नवीन ग्राहकांची रक्कम काढल्याची बाब उघड होत गेली. दरम्यान, आतापर्यंत ४२ ग्राहकांच्या खात्यातून २१ लाख ४३ हजार रुपये काढण्यात आले असल्याचे समोर आले. तशा तक्रार बँकेत ग्राहकांनी केल्या आहेत. दरम्यान ‘बँक ऑफ महाराष्ट्रा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशी करून पोलिसांत तक्रार देऊन रोखपालास निलंबित केले आहे. मात्र ज्या ग्राहकांना नाहक फटका बसला त्यांची रक्कम केव्हा मिळणार याबाबत चिंता होती. दरम्यान, बँकेने मागील तीन दिवसांत १९ ग्राहकांना रक्कम परत केली आहे.

 

बँकेने पैसे परत दिल्याने पत्नीच्या उपचाराची व्यवस्था झाली
पत्नीच्या उपचारासाठी बँकेत ठेवलेली रक्कम काही दिवसांपूर्वी परस्पर काढण्यात आली होती. त्यामुळे पत्नीच्या उपचारासाठी रक्कम उरली नव्हती. दरम्यान, परस्पर उडवलेली रक्कम बँकेने खात्यात टाकली आहे. त्यामुळे आता पत्नीच्या उपचाराची व्यवस्था झाली.
- देविदास यावले, ग्राहक, शिरजगाव कसबा.

 

रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू
रक्कम गेल्याबाबत ज्या ग्राहकांच्या तक्रारी बँकेला प्राप्त झाल्या होत्या. त्यांना बँकेकडून रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचवेळी ज्यांची रक्कम लाखांपेक्षा अधिक आहे, त्या प्रकरणाचे दावे पुणे कार्यालयाकडून मंजूर झाल्यानंतर ती रक्कमही परत करण्यात येईल.
- राजेंद्र वानखडे, शाखा व्यवस्थापक. शिरजगाव कसबा.

बातम्या आणखी आहेत...