आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेनमच्या फाशीसाठी जगाचे लक्ष नागपूरच्या कारागृहाकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील एकमेव फाशीची शिक्षा झालेला आरोपी याकूब अब्दुल रझ्झाक मेमन याची क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्याला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यादृष्टीने नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. याकूबला ३० जुलैपर्यंत फाशी देण्यात येणार असल्याचे वृत्त आल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष नागपूर मध्यवर्ती कारागृहाकडे लागले आहे.

याकुब हा येथील मध्यवर्ती कारागृहाच्या फाशी यार्डमध्ये कैदेत असून त्याच्या शेवटच्या भेटीसाठी त्याच्या कुटुंबातील सदस्य नागपुरात दाखल झाले आहेत. याकुबचा चुलत भाऊ उस्मान शेख याने सोमवारी नागपूर कारागृहात याकुबची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. तर मंगळवारी उस्मान मेमन आणि दिल्लीहून नागपुरात आलेले याकुबचे वकील शुबेल फारुख हे आज नागपुरात आले होते.

अॅड. फारुख यांनी सकाळी ९.२५ वाजता कारागृह प्रशासनाला अर्ज सादर करुन याकुबला भेटण्याची विनंती केली. यावेळी त्यांच्यासोबत उस्मानही होता. कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी अॅड. फारुखचा अर्ज स्वीकारुन साडेनऊ वाजता मुलाखत कक्षात याकुबला भेटण्याची मुभा दिली. अॅड. फारुख यांनी त्याच्याशी जवळपास पाऊणतास चर्चा केली.त्यानंतर अॅड. फारुख आणि उस्मान पोलिस वाहनातून कारागृहाबाहेर गेले.

याकूबचे कुटुंब नागपुरात!
सर्वोच्च न्यायालयात दाखल क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना याकूबच्या वकिलांना होती. याकूबची फाशी टळणे अशक्य अाहे, याची जाणीव झाल्यामुळे याकूबची पत्नी, मुलगी आणि काही सदस्य नागपुरात दाखल झाले, अशी माहिती आहे. त्यांच्यापैकी चुलत भाऊ उस्मान हाच दोन दिवसांपासून याकूबशी भेटतो आहे. पत्नी आणि मुलीच्या भेटीसाठी कारागृह प्रशासनाकडे अर्ज आला नाही. परंतु ते नागपुरातील एका हॉटेलमध्ये असल्याचे वृत्त आहे.

नागपूर, पुणे आणि मुंबईत हायअलर्ट जारी
पुणे येथील येरवडा आणि नागपूर कारागृहातच फाशी देण्याची सुविधा आहे. याकूबच्या फाशीवरुन राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून नागपूर, पुणे आणि मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. याकूबला नागपुरात फाशी देण्यासाठी कारागृह प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु ऐन वेळी समस्या उद्भवली तर येरवडा कारागृहातही हलवले जाऊ शकते. येरवडा कारागृहातही फाशीची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
याकूबला शिक्षेची चिंता नाही : अॅड. फारुख
याकूबशी अनेक विषयांवर चर्चा झाली. क्युरेिटव्ही पिटीशनच्या निकालावर पुढील कारवाईची दिशा ठरेल. कायद्यानुसार पुढील याचिका करण्यात येईल, परंतु याकूबला फाशीच्या शिक्षेविषयी माहिती आहे. त्याला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास असून शिक्षेविषयी त्याला चिंता नसल्याची प्रतिक्रिया अॅड. शुबेल फारुख यांनी याकूबची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली.

राज्यपालांकडे याकूबची दया याचिका दाखल
याकूब मेमनच्या वतीने राज्यपाल यांच्याकडे दयेचा अर्ज करण्यात अाला अाहे, अशी माहिती याकूबचे वकील अनिल गेडाम यांनी दिली. यापूर्वी राष्ट्रपतींकडे याकूबच्या भावाने दया याचिका दाखल केली हाेती, ती फेटाळण्यात अाली अाहे. असे असले तरी अाराेपीला स्वत:लाही दयाअर्ज करण्याचा अधिकार असल्याचे गेडाम म्हणाले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही गेडाम यांच्या वक्तव्याला दुजाेरा दिला. ‘याकूबला निश्चितच तसा अधिकार अाहे. मात्र राष्ट्रपतींनी मेरिटच्या निकषावर यापूर्वीच त्याची दया याचिका फेटाळून लावल्यामुळे अाता राज्यपालांनीही मुदतीत याकूबच्या अर्जावर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अाहे.’
बातम्या आणखी आहेत...