आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंटेनरने काका-पुतण्याला चिरडले, किमान आता तरी खड्डे बुजवा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘व्हिडीओगेम’ची फ्लॉपी खरेदी करण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या काका-पुतण्याला मनपाच्या कंटेनरने चिरडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. १) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास नागपुरी गेट पोलिस ठाण्यासमोर घडली. मृतकामध्ये सैय्यद रफिक सैय्यद कासम (३५) पुतण्या सैय्यद नवाज सै. महमूद ( ११), दोघेही रा. ताजनगर यांचा समावेश आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने कंटेनरवर तुफान दगडफेक केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैय्यद रफिक सैय्यद कासम दुपारच्या सुमारास पुतण्या सैय्यद नवाज सै. महमूद याला व्हिडीओ गेमची फ्लॉपी खरेदी करून देण्यासाठी अॅक्टिव्हा दुचाकीने (क्रमांक एम. एच. २७ एएक्स ११०) जात होते. दरम्यान नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या समोर दुचाकी आली असता त्याचवेळी मनपाचा कचरा वाहून नेणारा कंटेनर जात होता. पुढे रस्ता दुभाजक असल्यामुळे कंटेनर थोडा वळला. याचवेळी रस्त्यावर असलेल्या किरकोळ खड्ड्यांमुळे कंटेनरचा खडखडाट झाला. यातच सैय्यद रफिक सैय्यद कासम यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दोघेही पडले कंटेनरच्या मागील चाकात आले. यामुळे रफिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर नवाजच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला त्वरित इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान नवाजचाही मृत्यू झाला. अपघातात काका पुतण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच जवळपास हजारो नागरिकांचा जमाव घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी संतप्त जमावाने कंटेनरवर तुफान दगडफेक सुरू केली. पोलिसांना माहिती मिळताच क्युआरटी, राखीव पोलिस दल, तसेच इतर ठाण्यांचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना जुमानता संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. यावेळी घटनास्थळावर आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी कंटेनर घटनास्थळावरून हटवला. माहिती मिळल्यानंतर सीपी दत्तात्रय मंडलिक, उपायुक्त शशीकुमार मीणा, एसीपी चेतना तिडके, मिलिंद पाटील, पंजाबराव डोंगरदिवे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कुमक तैनात होती.दरम्यान, दोन्ही मृतदेह इर्विनमध्ये आणले त्यावेळी शवविच्छेदन गृहाबाहेर प्रचंड गर्दी जमली होती.

अपघातात कर्ता व्यक्ती गेल्याने कुटंुब निराधार
रफिक हे कंत्राटदार होते. तसेच कुटूंबातील कर्ता व्यक्ती होते. गुरूवारी दुपारी ते घरून बाहेर निघाले त्यावेळी पुतण्या नवाज हा सुद्धा त्यांच्या मागे लागला होता. नवाजला व्हीडिओ गेमची कॅसेट खरेदी करायची होती, त्यासाठीच त्याचा आग्रह सुरू होता. मात्र कॅसेट खरेदी करण्यापूर्वीच या काका -पुतण्यांवर काळाने घाला घातला.

गुरूवारी झालेल्या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी आता तरी खड्डे बुजवा, अशी मागणी प्रशासनाला केली आहे. कारण ज्या कंटेनरमुळे काका -पुतण्यांचा जीव गेला. त्या अपघातस्थळावर दोन खड्डे आहेत, या खड्ड्यात कंटेनर गेला आणि एकदम खडखड आवाज झाला, त्यामुळे दुचाकीस्वार रफिक दचकल्याने ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. दरम्यान शहरात असे जीवघेणे अनेक खड्डे आहे. दोन जीव गेले आता तरी प्रशासनाने खड्डे बुजवावे अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

अपघातानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त मनपा आयुक्तांची जिल्हा कचेरीत तातडीची बैठक झाली. बैठकीत घटनास्थळ परिसरातील नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या चौकात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. त्यामुळे फ्लेक्स काढून टाकावे,चौकातून होणारी जडवाहनांची वाहतूक बंद करावी, मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...