आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 25 हजार शेतकऱ्यांना 203 कोटींची कर्जमाफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २५,२०५ शेतकरी थकबाकीदार सदस्यांना २०३ कोटी ४९ लाख २२ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्हयातील शेतकरी सभासद असलेल्या ७६.४४ टक्के या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. 

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेऊन एप्रिल २००९ नंतर कृषी कर्जाचे वाटप झालेले ३० जून २०१६ रोजी थकीत असलेल्या शेतकरी सभासदांची संपूर्ण माहिती एकत्र करुन त्यांना परत कर्ज उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्राधिकृत अधिकारी असून शेतकऱ्यांना सहज सूलभपणे कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार यावर्षी सुमारे पाच हजार शेतकरी सभासदांना सुमारे ३० कोटी रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण केले आहे. 

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत थकबाकी असलेल्या सुमारे २२,२८७ शेतकरी सभासदांना १३६ कोटी ५९ लाख ८९ हजार रुपयाचे कर्जमाफी मिळणार असून त्यांचा सातबारा कोरा होत असल्यामुळे नवीन कर्जही उपलब्ध होणार आहे. यामध्ये सरासरी थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी ८३.७७ टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

तसेच दीड लाखाच्यावर थकीत कर्ज असलेल्या २,९१८ शेतकऱ्यांना ६६ कोटी ८९ लाख ३३ हजार रुपये कर्जमाफी मिळणार असून त्यासाठी शेतकरी सभासदांना दीड लाखावरील थकीत कर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखावरील थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी उर्वरित रक्कम भरुन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...