आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 तरुण-तरुणींनी 27 हजार झाडे लावली; वाढदिवस-लग्नदिनी पण वृक्षारोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याने जुलैमधील कोटी वृक्ष लागवडीसाठी जोरदार तयारी चालवली आहे. गतवर्षीही सरकारने अशी माेहीम राबवली.पण प्रत्यक्षात किती झाडे जगली याची माहिती कोणाकडेही नसते. या पार्श्वभूमीवर कोलकात्यातील गायत्री परिवारातील तरुणाईचा समावेश असलेला ग्रामोत्थान ग्रुप दर रविवारी झाडे लावण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे.

सुमारे २०० तरुण-तरुणींच्या या ग्रुपने आजवर २७ हजार झाडे लावली. हा ग्रुप झाडे लावूनच थांबत नाही, तर त्यांची संपूर्ण देखभाल करतो. येत्या ३१ जुलैला या उपक्रमातला ३०० वा रविवार आहे.

ग्रामोत्थान ग्रुपचे प्रमुख रवी शर्मा गायत्री परिवाराच्या कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांच्याशी संवाद झाला. त्यातून दर रविवारी झाडे लावण्याच्या उपक्रमाविषयी माहिती मिळाली. शर्मा कुटुंबीय मूळचे अकोल्याचे. ३३ वर्षांपूर्वी प्रल्हाद शर्मा यांनी नोकरीनिमित्त कोलकाता गाठले आणि तिथेच स्थायिक झाले. रवी शर्मा यांचा जन्म आणि शिक्षणही कोलकात्यालाच झाले. ते गायत्री परिवाराच्या संपर्कात आल्यावर सक्रिय कार्यकर्ते झाले. रवी शर्मा यांनी दर रविवारी वृक्षारोपणाचा उपक्रम जाहीर केला. राजेश काबरा, सूरज जयस्वाल यांनी तो उचलून धरला. कोलकात्यातील मराठी वसाहतीत याचा प्रारंभ झाला.

३१ जुलैला ३००वा रविवार : येत्या३१ जुलै रोजी वृक्षारोपण उपक्रमाचा ३०० वा रविवार आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमाला गायत्री परिवाराचे प्रमुख प्रणव पंड्या उपस्थित राहाणार आहे. पंड्या यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

झाडे लावूनच ग्रामोत्थान ग्रुप थांबत नाही तर लावलेली झाडे जगली पाहिजे याचीही काळजी घेतो. देखभालीसाठी पाच ते सहा जणांचा समावेश असलेले एक पथक नेमण्यात आले आहे. ही टीम पाचही िजल्ह्यांत फिरून प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करते. त्यामुळे लावलेली झाडे शंभर टक्के जगतात.

कोलकाता, नाॅर्थ-२४ परगणा, साऊथ-२४ परगणा, हुबळी हावडा या िजल्ह्यांत ग्रामोत्थान ग्रुपचे वृक्षारोपण आहे. रस्त्याच्या दुतर्फा, बगिचे, क्लब तसेच संस्थेत झाडे लावली जातात. आतापर्यंत २७ हजार झाडे लावली आहेत. वाढदिवस, स्मृतिदिनानिमित्त लग्नाच्या वाढदिवसानिमित्तही वृक्षारोपण करण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...