आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत २९८२ कोटी ६२ लाखांच्या पुरवणी मागण्या मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मंगळवारी फक्त दहा मिनिटांत पाच विभागांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्यानंतर बुधवारी अडीच तासांच्या चर्चेनंतर दोन हजार ९८२ कोटी ६२ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या. दोन दिवसांत १७ विभागांच्या ३ हजार २३५ कोटी ९४ लाखांच्या मागण्या विनाचर्चा मंजूर करण्यात आल्या.

बुधवारी कृषी, पदुम, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास व जलसंधारण, पर्यावरण व सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या १३ पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. यात सगळ्यात जास्त पुरवणी मागण्या १ हजार ७१५ कोटी ८५ लाख रुपयांच्या , पदुम विभागाच्या होत्या. त्याखालोखाल ग्रामविकास जलसंधारण (५७१ कोटी ३१ लाख), सार्वजनिक बांधकाम (५३५ कोटी ७६ लाख), सहकार, पणन व वस्त्रोद्योग (१३३ कोटी ७१ लाख) आणि सगळ्यात कमी पर्यावरण विभागाच्या (२५ कोटी ९९ लाख) पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

बच्चू कडू यांनी कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करीत शेतकऱ्यांचा शेतमाल ५० टक्के जादा रकमेने विकत घेऊ, असे म्हटले; पण शेतकऱ्यांना फक्त १५ टक्केच रक्कम जादा मिळाली. तसेच पंतप्रधानांच्या ५६ इंच छाती आणि नोटाबंदीवर बोलण्यास सुरुवात केली. यावर सत्ताधारी आमदारांनी आक्षेप घेतला असता बच्चू कडू यांनी शहरी आमदारांना शेतकऱ्यांबाबत काय कळणार, असे वक्तव्य केले. तेव्हा तालिका अध्यक्षांनी त्यांचा माइक बंद करून यशोमती ठाकूर यांना बोलण्यास सांगितले. तेव्हा चिडलेल्या बच्चू कडू यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेत टेबलवर हात आपटत बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. तालिका अध्यक्षांनी त्यांना तीन मिनिटांची वेळ वाढवून दिली.
बातम्या आणखी आहेत...