आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळसाठी 302 कोटींची अमृत योजना, राज्यमंत्री मदन येरावार यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - यवतमाळातील पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत ३०२ कोटींची योजना मंजूर करण्यात आली. दोन टप्प्यात ही योजना कार्यान्वित केली जाणार असून, लवकरच निविदा प्रक्रियेस प्रारंभ होणार असल्याचे यवतमाळचे आमदार तथा ऊर्जा पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सांगितले. राज्य शासनाने योजनेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर योजना केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.
यवतमाळ शहरासाठी निळोणा धरणातून १९६७ साली ५३ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. १९७२ मध्ये योजना पूर्ण होऊन कार्यान्वित झाली. यवतमाळ शहरासह आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या सातत्याने वाढल्याने योजनेचा वेळोवेळी विस्तार करण्यात आला. शहराला आता वडगाव, उमरसरा, मोहा, भोसा, डोळंबा, पिंपळगाव, लोहारा, यवतमाळ ग्रामीण ही गावे जोडण्यात आल्याने शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत राज्यमंत्री येरावार यांच्या पुढाकाराने ही योजना सादर करण्यात
आली होती.

या योजनेला दोन टप्प्यात मान्यता दिली असून, दोन टप्प्यात काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५८ कोटी ५८ लाख, तर दुसऱ्या टप्प्यात २४४ कोटी असे एकूण ३०२ कोटी ९१ लाख रुपये खर्च करून ही योजना पूर्ण केली जाणार आहे. योजनेंतर्गत यवतमाळ लगतच्या गावांसाठी बेंबळा धरणातून पाणी घेतले जाणार आहे. बेंबळा धरण येथून टाकळी येथे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत धरणातील पाणी आणले जाणार आहे. यासाठी हजार मिमी व्यासाच्या
१९.७५ किमी लांबीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. टाकळी येथे ४८ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र राहील.
टाकळी जलशुद्धीकरण केंद्रापासून गोधणी रोड साठवण टाकीपर्यंत ८०० मिमी व्यासाची ९.२० किमीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत निळोणा धरणातील जलशुद्धीकरण केंद्र उर्ध्व वाहिनी तसेचबेंबळा धरणाच्या बुडीत क्षेत्रात उद््भवाची कामेही केली जाणार आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी अशुद्ध पाण्याची दोन हजार बीएचपीची पंपिंग मशिनरी, १५०० बीएचपीची शुद्ध पाण्याची पंपिंग मशीन एक्स्प्रेस फिडर एससीएडीएसह उभारली जाणार आहे. तीन मुख्य संतुलन टाक्या तसेच पाण्याच्या उंच १६ टाक्याही बांधण्यात येतील. शुद्ध पाण्याची गुरुत्व वाहिनी मुख्य संतुलन टाकी ते पाण्याच्या उंच टाकीपर्यंत ४० किमी अंतरापर्यंत टाकली जाणार आहे. या योजनेंतर्गत शहरात पाणी उतरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाइपलाइनचे जाळे टाकले जाईल. जवळपास ५४५ किमीची ही अंतर्गत पाइपलाइन राहणार असल्याचे राज्यमंत्री येरावार यांनी सांगितले. या योजनेमुळे यवतमाळ शहरासह परिसरातील नागरिकांची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे.
पाणी समस्या मिटणार
यवतमाळ शहरामध्ये उन्हाळ्यादरम्यान निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची गरज होती. त्या अनुषंगाने अमृत योजनेसाठी पाठपुरावा करण्यात आला. या योजनेमुळे नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत होऊन पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
मेगावॅटचा सोलार प्रकल्प
अमृतयोजनेंतर्गत यवतमाळ शहराला पाणीपुरवठा सुरळीत राहावा, म्हणून बेंबळा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात चार मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पावर २१ कोटी ६४ लाख रुपये खर्च केले जातील. योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सर्व टाकी पाइपलाइनला जलमापक यंत्र बसवण्यात येणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून, २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य होणार
असल्याचे येरावार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...