आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 33 Percent Professors Work In Engineering Colleges In Amravati Division

अमरावती विभागात ३३ टक्के प्राध्यापकांवर 'अभियांत्रिकी'ची धुरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांचा अनुशेष कायम असल्याने तंत्रशिक्षण क्षेत्रात निरंतर विकास साध्य कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती विभागात केवळ ३३ टक्के प्राध्यापकांवर अभियांत्रिकी शिक्षणाची धुरा असून, येथील तंत्रशिक्षणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे. स्थानिक हव्याप्र मंडळात जानेवारीपासून आयोजित आयएसटीईच्या ४५ व्या राष्ट्रीय परिषदेत तंत्रशिक्षणातील अशा विविध समस्यांवर मंथन केले जाणार आहे.

एकीकडे तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना युवकांचा मात्र, याकडे फार कमी कल असल्याचे देशात निदर्शनास आले आहे. अभियांत्रिकीच्या पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाकरिता निर्धारित असलेल्या जागाएवढेदेखील प्रवेश होत नसल्याचे चित्र संपूर्ण देशात आहे. तंत्रशिक्षणावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत रोजगार मिळत नाही. लाखो रुपये खर्च केल्यानंतर वेठबिगाराप्रमाणे वेतन मिळत असल्याने अनेक विद्यार्थी तंत्रशिक्षण घेणे टाळत आहे.

पश्चिम विदर्भात अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागा शिल्लक राहण्याचे प्रमाण अन्य भागांच्या तुलनेत अधिक आहे. येथील विद्यार्थीदेखील अधिक प्रगत तसेच शैक्षणिक दर्जा चांगल्या असलेल्या महानगरातील संस्थांमध्ये शिक्षण घेताना दिसून येत आहे. तंत्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर हे स्थानिक शिक्षण संस्थांकरिता मोठा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विद्यमान नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनादेखील प्रवेशासाठी स्पर्धेत उतरण्याची वेळ आली आहे. मोठा आटापिटा केल्यानंतर प्रवेश मिळतात. मात्र, त्यानंतर देखील अनेक जागा रिक्त राहत असल्याचे चित्र आहे.

विद्यार्थी नसल्याने अनेक महाविद्यालयांमधील अभियांत्रिकीचे विविध अभ्यासक्रम बंद करण्याची वेळ शिक्षण संस्थांवर आली आहे. शैक्षणिक स्तराचा विचार करता ही अत्यंत धक्कादायक अशी बाब असून, याबाबत देशपातळीवर आता मंथन आरंभ झाले आहे. देशपातळीवर कार्यरत असलेल्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन या नामांकित संस्थेच्या अमरावती येथील ४५ व्या राष्ट्रीय परिषदेत प्रामुख्याने या विषयावर चर्चा केली जाणार आहे.

राष्ट्रीय परिषदेला यांची उपस्थिती
तीनदिवसीय परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय रसायने आणि उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. सुनील देशमुख, ताजीम तोशीओ, डॉ. इसामू कोयामा (जपान), डीटीईचे संचालक डॉ. एस. के. महाजन, एआयसीटीईचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ. ए. के नासा, एमएसबीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ, रॉल्फ डुंगेफल्ड(जर्मनी), डॉ. फिन बर्गरेन (डेन्मार्क), डॉ. विनोद इंदूरकर, डॉ. एस. व्ही. सावदेकर उपस्थित राहणार आहेत.

उद्योगविषयक अभ्यासक्रम
अमरावतीतयेऊ घातलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या अनुषंगाने त्यांना अपेक्षित असलेले मनुष्यबळ लक्षात घेता त्याप्रकारे तंत्रशिक्षणातील अभ्यासक्रमाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. याअनुषंगाने या राष्ट्रीय परिषदेत चर्चा केली जाणार आहे.