आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीटकनाशकाचे 37 बळी, सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना बाधा; प्रतिबंधीत औषधींचा सर्रास वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला/ यवतमाळ/ बुलडाणा- किटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील १८ शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत अाहे. प्रतिबंधित औषधींचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे हे बळी जात असल्याचे आरोप होत आहेत. ‘दिव्य मराठी’ने प्रत्यक्षात पाहणी केली असता या अाैषध फवारणीमुळे अकोला, बुलडाणा व यवतमाळ मिळून ३७ बळी गेल्याचे व ६०० जणांना बाधा झाल्याचे धक्कादायक वास्तव समाेर अाले अाहे. 

विदर्भातील काही भागात प्रतिबंधित बियाण्यांची झालेली विक्री  हेच या शेतकऱ्यांचा बळी घेण्यामागचे मुख्य कारण असल्याचा अाराेप शेतकऱ्यांतून हाेत अाहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात कापूस लागवडीसाठी ८ लाख प्रतिबंधीत बियाने विकल्याचा आरोप आहे. कृषीमंत्र्यांच्या बुलडाणा जिल्ह्यात किटकनाशक फवारणीच्या वेळी झालेल्या विषबाधेने ११ जणांचा तर अकोला सामान्य रूग्णालयात ८ जणांचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. के. एस. घोरपडे यांनी दिली. मात्र या प्रकरणांची पडताळणी सुरू आहे असे त्यांनी सांगितले.  तसेच  अकाेला जिल्ह्यात सुमारे १०० तर बुलडाणा जिल्ह्यात ६० च्या अासपास शेतकऱ्यांनी विषबाधेवर उपचार घेतले आहेत. तर वर्ध्यात २५ जणांनी उपचार घेतले अाहेत. खासगी रूग्णालयातील  संख्या यापेक्षा जास्त अाहे.

अशी घ्या काळजी : खाद्यपदार्थ, इतर औषधे, लहान मुले यांचेशी कीटकनाशक व रोगनाशक औषधांचा संपर्क होऊ देऊ नये, औषधाचे मिश्रण करतांना किंवा फवारणीचे काम करतांना खाणे पिणे, धुम्रपान करु नये,फवारण्याच्या नळीतील घाण कचरा तोंडाने फुंकु नये, फवारण्याेच औषध हाताने ढवळू नये, अाैषध फवारल्यानंतर पिक व भाजीपाला १५ दिवस खाण्यास देऊ नये, औषधाची फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी, फवारणीचे काम झाल्यावर कपडे व हात साबणाने धुऊन काढावे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.
 
कृषी आयुक्तांना निलंबित करा : विखे
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणाची ‘एसअायटी’मार्फत चाैकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच या गंभीर प्रकरणाची वेळीच दखल न घेतल्यामुळे राज्याचे कृषी आयुक्त, विभागीय सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना निलंबित करावे. त्यासोबतच संबंधित औषध कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे , अशीही मागणी त्यांनी केली.  विखे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की,  ‘१८ शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्यानंतरही कृषी आयुक्तांनी तातडीने यवतमाळचा दौरा केला नाही. कृषी आणि आरोग्य विभागाने फवारणी करताना घ्यावयाची दक्षतेबाबत  जनजागृती केलेली नाही. औषध कंपन्या तर ही शेतकऱ्यांची चूक असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकू पाहत आहेत.’
 
मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दाेन लाख मदत
कापूस आणि सोयाबीन पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केली आहे. या प्रकरणाची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडून सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच अशा घटना रोखण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष स्वरूपाच्या प्रतिबंधक किट वितरित करण्याचे कीटकनाशक कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे.  

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली.  मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे त्यांनी आदेश दिले. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर नावे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतचे विमा संरक्षण तत्काळ देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल. या योजनेचे विमा संरक्षण मिळू न शकणाऱ्या शेतमजुरांच्या कुटुंबीयांना याच योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येणार आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तांत्रिक कारणास्तव विमा कंपन्यांकडून मदत मिळू न शकल्यास त्यांनाही मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल.  

याशिवाय सर्व कीटकनाशक कंपन्यांना कीटकनाशकांची विक्री करताना संरक्षक किट पुरवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. कंपन्यांच्या सीएसअार निधीतून हा पुरवठा करण्यासाठी सर्व कीटकनाशक कंपन्यांना आदेश देण्यात येत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...